माधवी घारपुरे
सदानंद सावधाते’ व्याख्यान क्षेत्रातले एक नावाजलेले व्यक्तिमत्त्व. त्यांच्या वक्तृत्व शैलीवर जान कुर्बान! उद्बोधक, प्रेरक, रंगकम, ज्ञानदम तथा। चर्तुविधही वक्तृत्व सर्व एकत्र दुर्लभम।।
हा श्लोक त्यांना पूर्णपणे लागू होता. पु. लं. च्या भाषणाला कोणी येईल का? अत्र्यांच्या (आचार्य) भाषणाला गर्दी जमेल का? (जमत होती का?) हे प्रश्न विचारणे जितकं वेडेपणाचे तितकंच वेडेपणाचा प्रश्न हा की, सावधात्यांच्या भाषणाला लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील का?
विषय पुराणाचा असो की, राजकारणाचा असो की शैक्षणिक असो. त्यांची बॅटिंग चौफेर असे. असे सर्व असतानादेखील मागच्या आठवड्यात त्यांच्या भाषणाला हौसेने गेलो आणि घोर निराशा पदरी पडली म्हणण्यापेक्षा वाईट वाटले, एक तर त्यांना धरून धरून स्टेजवर चढविले. उभं राहून बोलता येईना म्हणून जरा वेळानं बसले. कवळी आल्यामुळे उच्चारात फरक पडत होता. बोलता बोलता लाळ गळत होती. बरे, भाषण लवकर संपवावे तर तेही नाही. बोलतच राहिले. लोकांनी टाळ्या वाजवल्या. पण आजपर्यंतच्या टाळ्या कौतुकाच्या, यशस्वितेच्या होत्या. त्याच फक्त त्यांना परिचयाच्या. त्यामुळे या टाळ्यांबद्दल? समुदाय असा असतो की, जो तुम्हाला डोक्यावर घेऊन आज नाचतो तर उद्या उचलून खाली पाडतो.
भाषण संपल्यावर त्यांना भेटायला गेले तर बाकी गोष्टी त्यांच्या गावीच नव्हत्या. ‘कसं’ वाटलं भाषण? नेहमीसारखं झालं ना? अर्थात लोकांच्या टाळ्याच सांगत होत्या खरं. त्यांनीच असं म्हटल्यावर माझा प्रश्नच मिटला.
घरी परतताना मन बैचेन होते. चढत चढत माध्यान्हीला गेलेला सूर्य मावळतोच. चढण चढत उंच चढलो तरी एका क्षणाला उत्तराला सुरुवात होतेच. उमललेले फूल तर काही तासातच कोमेजायला लागतं. वाटलं निसर्गच तुम्हाला सांगतो की, आपला काळ संपल्यावर आपणच पायउतार व्हावे. हा प्रत्येक क्षेत्रातला अलिखित नियम आहे. मग सावधाते सर हे एक प्रातिनिधिक उदाहरण झालं. पण प्रत्येकाने एक गोष्ट कटाक्षाने लक्षात ठेवायला हवी.
व. पु. काळ्यांची आठवण झाली. ते म्हणायचे, कलाकाराने किती काळ काम करावे? जोपर्यंत पाण्यावर तरंग उठतात, तोपर्यंत जरूर स्टेजवर विहरावे. ‘तरंगाचा’ ‘तरंग’ झाला की बंद करावे. पण कलाकाराला हे समजणे महत्त्वाचे आहे. हेच खरं आहे. कारण प्रहर बदलला की लहर बदलते. वय झाल्यावर उंचावरची फुले आपल्या हातात येत नाहीत, हे कळले की छत्रीच्या दांड्याने फांदी ओढण्याचा प्रयत्न करूच नये. लांबून हात जोडून गप्प राहावे. उंचावर नवी उमललेली फुले पाहून आनंद घ्यावा. पूर्वी आपणही कधी या उंच फांदीवर होतोच की! त्या फुलांनी जागा रिकामी केली. आपण ती घेतली. अजूनही मी उंचावरच फुलणार हा विचार सोडून द्यायला हवा! परिवर्तन हा निसर्ग नियम आहे. तो आनंदाने ‘मी’पणामुळे स्वीकारला जात नाही. वेळीच उंचावरून, त्या स्थानावरून अलिप्त होणे जमत नाही, असं नाही. मन ते करू देत नाही. मग अशा माणसांची अवस्था ‘अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी’ यासारखी होते. चेहऱ्याला लागलेला रंग सोडायला नट तयार होत नाही. बैठकीची गादी सोडायला गायक तयार होत नाही. माईक सोडायला वक्ता तयार होत नाही. ज्येष्ठांच्या अशा वागण्यामागचे कारण काय?
यामागचे खरे कारण ‘आत्मप्रेम’. आत्मभान सुटते आणि आत्मप्रेम राहते. एकदा तुम्ही सर्वोत्तम ठरलात, समाजाने मानलं की वय झाल्यावरही परत अपेक्षा करणे म्हणजे एकदा ‘भारतरत्न’ मिळाल्यावर छोटे-छोटे पुरस्कार घ्यायला तयार राहणे होय.
प्रसिद्धी कमी होऊ नये हा यामागचा दुसरा भाव. पण माणसाने तिच्यामागे जाऊ नये, तीच तुमच्या मागे योग्य वेळी येते. ज्येष्ठांनी ज्ञानप्रदर्शनापेक्षा मार्गदर्शन करावे आणि आपला मान आपण ठेवून घ्यावा. न. चिं. केळकरांना लोकांनी विचारले होते की, तुम्ही अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष का होत नाहीत? तर त्यांनी उत्तर दिले होते. ‘‘साहित्य संमेलनाचे अध्यक्ष का झालात?’’ असे लोकांनी उद्या विचारू नये म्हणून. ही खरी अलिप्तता. त्यांची अलिप्तता खांबासारखी होती. वेल खांबाला धरून सर सर वर चढते. पण खांबाला त्याचे काही सुख-दु:ख नसते.
कोणत्याही स्थानावरचा ज्येष्ठ. मग तो वक्ता, नट, गायक, कोणीही असो. तो एका जागी पाय रोवून उभा असलेल्या वृक्षासारखा असतो. त्याच्या फांद्या सभोवार पडलेल्या असतात. पण झाडाला धरून. झाड स्वत:साठी कधीच जगत नाही. त्याचे अस्तित्व त्याच्यासाठी नसतेच. ज्येष्ठाबद्दल अलिप्तता आणि जवळीक दोन्ही गोष्टी एकवटायला हव्यात. या दोन्ही साधुवृत्ती आहेत. भारतीय संस्कृतीत आपला चौथा आश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम. वरील दोन्ही वृत्ती आयुष्य कळसाच्या जागी नेऊन ठेवू शकतात. अशा वेळी मी, माझे आणि मला कशासाठी? पुन्हा लोकमान्य आठवतात. ‘भारताला इतक्या लवकर स्वातंत्र्य मिळणार नाही’. मिळालेच तर राष्ट्रपतीपद नको. पंतप्रधान पद नको. खडू घेईन आणि फर्ग्यूसनमध्ये जाऊन गणित शिकवायला सुरुवात करीन. हेच कळसाला पोहोचलेले आयुष्य.