प्रा. देवबा पाटील
बरं का, छोट्या दोस्तांनो! बाळू हा मुलगा होता अगदी तुमच्यासारखाच. बरं! बाळूचा दादा, त्याची ताईसुद्धा त्याच्यासारखेच अभ्यासू, हुशार होते. त्यामुळे या तिन्ही भावंडांचे चांगलेच मेतकूट जमायचे. आई-बाबांनी घरात काहीही मिठाई, फळे, खाऊ आणला म्हणजे आई सगळ्यांना थोडा थोडा, पण सारखाच हिस्सा तिच्या हाताने वाटून द्यायची. खाऊ जास्त असल्यास एकाच वेळी पुरा खाऊ न देता दोन सांजेस द्यायची किंवा दुसऱ्या दिवशी देण्यासाठी ठेवून द्यायची.
बाळूला मात्र नेमकं हेच खटकायचं. त्याला वाटायचं, आईने सगळा खाऊ एकाच वेळी आपणास द्यावा. त्यामुळे त्याचं मन नेहमी शिल्लक राहिलेल्या खाऊकडे व नजर फळीवरच्या डब्यांकडेच असायची. कधी कधी तर आई बाहेर गेली हे बघून, दादा, ताई कोणीही घरात नाही, हे पाहून स्वारी हळूच घरातील एखादा स्टूल फळीखाली ठेवायची. त्यावर चढून आवाज न करता फळीवरील एकेक डबा हुडकायची व चूपचाप खाऊतील थोडासा हिस्सा चोरून मटकावयाची, तर या बाळूला अशी चोरून खाण्याची फारच वाईट सवय जडली होती. चुकून आईच्या लक्षात आलेच, तर आई दादा, ताईला रागवायची कारण ते मोठे होते व छोटा बाळू स्टूलवर चढून फळीवरचे डबे हुडकेल हे आईच्या ध्यानीमनीही नव्हते.
एके दिवशी सकाळी शाळा असल्यामुळे ताई – दादास एक तास जास्तीचा होता म्हणून त्यांना शाळेतच थांबावे लागले व बाळूचे तास संपल्यामुळे तो एकटाच घरी आला. सपाटून भूक लागलेली होतीच. घरी गेल्यावर त्याला आईने हातपाय धुण्यास सांगितले व तोपर्यंत त्याचे ताट वाढून ठेवले. एवढ्यात शेजारच्या रमाकाकू आल्या नि त्यांनी आईला घाईघाईतच काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर चलण्यास सांगितले. आई जाताना, बाळू, सावकाश जेवण कर. ताई-दादा येईपर्यंत बाहेर कोठेच जाऊ नकोस, असे बाळूला बजावून त्याची आई बाहेर गेली.
आई बाहेर गेल्याने तो ताटावरून उठला. फळीखाली स्टूल ठेवले नि त्याने स्टुलावर चढून फळीवरील एकेक डबा उघडून पाहण्यास सुरुवात केली. त्याला पहिल्याच डब्यात काजूसारखा पांढराशुभ्र भरपूर नवीन खाऊ दिसला. त्याने साखरेचा डबा काढला व तो साखरेबरोबर ते पांढरेशुभ्र नवीन काजू खाऊ लागला. शेंगदाणे, खोबरे, बदाम, काजूसारखा कोणताही सुकामेवा साखरेसोबत खायची त्याची वाईट खोडच होती. डबे, स्टूल जेथल्या तेथे ठेवले. ताटात वाढलेले तेवढे खाऊन घेतले. सगळे नीट झाकून ताई-दादाची वाट बघत बसला.
थोड्या वेळाने ताई-दादा व आई एकाच वेळी सोबतच घरी आले. दादा-ताईंची जेवणे झाली. बऱ्याच वेळानं त्याच्या पोटात गडबड होऊ लागली. उपाशी पोटी चोरून पांढऱ्या काजूचा खाऊ खाल्ल्यामुळे त्या खाऊने त्याचा परिणाम दाखवायला सुरुवात केली. त्याला त्रास व्हायला सुरुवात झाली आणि बाळूचे चोरून खाणे उघडकीस आले. आईला शंका आली तिने नवीन खाऊचा डबा उघडून बघितला तेव्हा तिच्या लक्षात आले. तिने बाळूला धीर दिला नि त्यास गावरान तूप व मऊसूत भात खाण्यास दिला. तिने ताई-दादाला बोलावून खाऊचा चोर कोण आहे, तेसुद्धा सांगितले. हे ऐकून ताई-दादा खूप पोट धरून हसू लागलेत, पण बाळू एकदम शरमिंदा झाला. तेव्हापासून चोरून खाण्याची सवय मोडली ती कायमचीच.