मुंबई : मुंबईतल्या सांताक्रूझ बेस्ट बस डेपोमधील शेकडो कंत्राटी बस चालक-वाहकांनी संप पुकारला आहे. बोनस, पगारवाढ न झाल्याने तसेच इतर मागण्याही पूर्ण न झाल्याने कर्मचारी संपावर गेले आहेत. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरुच राहणार असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांना या संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे
सांताक्रूझ बेस्ट बस डेपो मधील शेकडो कंत्राटी बस कर्मचारी आज सकाळी अचानक संपावर गेले. दिवाळी आली तरी बोनस नाही. पगार २३ हजार ५०० सांगून १८ हजार ५०० दिला जातो. बेस्टमध्ये काम करत असून देखील कामावर येण्यासाठी तिकीट काढावे लागते हा प्रवास मोफत करावा, सुट्ट्यांबाबत निर्णय नाही, अशा मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे.
आगर व्यवस्थापक सुरेश कलंत्रे म्हणाले, आम्ही कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे. त्यांनी त्याचे जे म्हणण आहे ते द्यावे. मी व्यवस्थापनाकडे त्यांच्या मागण्या मांडणार आहे. त्यांचे निवेदन थोड्याच वेळात मिळेल. या अगोदर कधीही त्यांनी मागणी केली नव्हती. सकाळी केवळ चार बस बाहेर पडल्या. आता कर्मचाऱ्यांचे निवेदन आले की, गाड्या सुरळीत होतील.
दरम्यान, मुंबईतल्या सांताक्रूझ डेपोतील कर्मचाऱ्यांनी आज सकाळी अचानक संप केल्यामुळे सांताक्रुज डेपोतली वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील जवळपास साडे चार तासांपासून कर्मचारी आणि प्रशासन यांच्यासोबत बातचीत सुरू असून अजूनही संपावर तोडगा निघाला नसल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत प्रशासनाकडून आम्ही तत्काळ कर्मचाऱ्यांचे निवेदन घेऊन पुन्हा एकदा वाहतूक व्यवस्था सुरळीत करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर कर्मचार्यांकडून आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा पवित्रा घेण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.