अहमदाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला दोन्ही खो-खो संघांनी सुवर्णपदकाची कमाई केली. त्यात पहिल्यांदाच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या महिला संघाच्या प्रियंका भोपीने नेहमीप्रमाणे या स्पर्धेत आपली चमक दाखवली. बिकट परिस्थितीतून आपल्या परिवाराला सावरण्यासाठी घरतील शेंडेफळ असलेल्या बदलापूरमधील साईगाव या छोट्याशा गावातील कन्या प्रियंका भोपीचा हा प्रवास अत्यंत संघर्षमय पण तितकाच कौतुकास्पद नि प्रेरणादायी आहे. प्रियंकाने २०१७ मध्ये सर्वोत्तम महिला खो-खोपटूला मिळणारा ‘राणी लक्ष्मीबाई’ पुरस्कार पटकावला आहे. ठाण्याला सहा वेळा राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम स्थान मिळवून देण्यात प्रियंकाची भूमिका महत्त्वाची आहे. बिकट आर्थिक परिस्थितीतून घराला बाहेर काढण्यासाठी सरकारी नोकरीची प्रतीक्षा असल्याची कैफियत प्रियंकाने ‘दैनिक प्रहार’शी बोलताना मांडली.
ज्योत्स्ना कोट-बाबडे
…आता जबाबदारी वाढली
या आधीही संघाला जिंकून देण्यासाठी खेळत होते आणि आताही तोच प्रयत्न आहे. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर आता जबाबदारी आणखी वाढल्याचे प्रियंका सांगते. या स्पर्धेआधीची आणि आताची प्रियंका सारखीच आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्ण, दक्षिण आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक हे महत्त्वाचे वाटतात; परंतु नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत ७ मिनिटे नाबाद राहत राणी लक्ष्मीबाई पुरस्कार मिळवणे ही कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी असल्याचे प्रियंका सांगते.
प्रियंकाचा “परिसस्पर्श”
हात लावेल त्याचे सोने करणारी अर्थात ज्या स्पर्धेत खेळेल तिथे हमखास पदक मिळवणारी, विजयश्री खेचून आणणारी ही बदलापूरची सुवर्णकन्या प्रियंका केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या कौशल्याने छाप पाडत आहे. जिल्हा, आंतरविद्यापीठ, राज्य, राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये प्रियंकाने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. राष्ट्रीय स्तरावरील तब्बल २३ स्पर्धा ती खेळली आहे. ३० राज्यस्तरीय आणि ३५ जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी झाली असून आपल्या संघाला पदक जिंकून दिले असल्याचे प्रियंका सांगते.
संघर्ष आजही सुरूच
पाचवीत असताना खो-खो खेळू लागली. मोठी बहीण खो-खो खेळायची. तिला बघून आवड निर्माण झाल्याचे प्रियंका सांगते. घरखर्च भागवण्याकरिता खेळातून मिळालेल्या पैशातून ती कुटुंबाचा खर्च भागवत आहे; परंतु या प्रियंकाचा संघर्ष अजूनही सुरू आहे. अजूनही चांगल्या सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत ती आहे. खेळ सांभाळत शिक्षणही पूर्ण करत असल्याचे प्रियंका सांगते.
खेळण्याशिवाय पर्याय नव्हता…
प्रियंका भोपीचा खो-खो खेळातील प्रवास अतिशय संघर्षाचा राहिला आहे. सुरुवातीला घरच्यांचा पाठिंबा नव्हता. बदलापूरमधील साईगाव हे तिचे छोटेसे गाव. आगरी-कोळी समाजाच्या असलेल्या प्रियंकाने सांगितले की, “सुरुवातीला कोणाचा विशेष पाठिंबा नव्हता. येथे मुलगी म्हणजे केवळ चूल आणि मूल सांभाळायचे एवढेच काम. पण घरची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे मला घराबाहेर पडून स्पर्धेत खेळण्याशिवाय दुसरा चांगला पर्याय दिसत नव्हता. त्यामुळे मी खेळाकडे वळले.” “नंतर हळूहळू पाठिंबा मिळत गेला; परंतु आजही मुलगी असल्यामुळे म्हणावा तितका प्रतिसाद नसतो.”, असे ती सांगते.
मॅरेथॉन सोडल्याची खंत, पण…
कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी प्रियंका मॅरेथॉन शर्यतीत धावायची. कल्याण, ठाणे, बदलापूर, पनवेल अशा स्पर्धेत बक्षिसे जिंकून यातून मिळणाऱ्या रकमेतून तिने कुटुंबाचा खर्च भागवला आहे. खो-खो वर फोकस केल्यामुळे ॲथलेटिक्समध्ये भाग घ्यायला मिळत नाही. सुरुवातीला दोन्ही स्पर्धा क्लॅश व्हायच्या. त्यामुळे फक्त खो-खो वर लक्ष केंद्रित केले. मॅरेथॉन सोडल्याचे दु:ख वाटत असले तरी खो-खोमुळे आनंद मिळतो, याचे समाधान असल्याचे प्रियंका सांगते.