मुंबई : सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांमुळे मुंबई-पुणे, मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक, मुंबई-अहमदाबाद या सर्वच महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे.
दिवाळीच्या सुट्टीमुळे आणि शनिवार रविवार सुट्टी यामुळे मुंबई बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे.
पुण्याकडे जाण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील खालापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या रांगा लागल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्याच्या दिशेने येणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बोरघाट आणि खालापूर टोलजवळ एक ते दीड किलोमीटरच्या लांबच-लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. बोरघाटात अमृतांजन पूलाजवळ वाहनांची रांग पाहायला मिळत आहे.
मुंबई गोवा महामार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली असून लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे दिवाळीसाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत.