जगातील लोकशाहीची जननी म्हणून जिचा बोलबाला आहे आणि भारतीय लोकशाहीचा जन्मच मुळी जिच्यापासून अथवा जिच्या मुशीतून झाला आहे, त्या ब्रिटनच्या लोकशाहीत सध्या घडलेल्या विचित्र घटनेने लोकशाहीवादी, लोकशाही समर्थक आणि लोकशाहीला दैवत मानणारे असे सारेच स्तिमित झाले आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी अवघ्या ४५ दिवसांमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या राजीनामा देतील, अशा चर्चा सुरू होत्या. ब्रिटनमधील या राजकीय घडामोडींमुळे एक विचित्र योगायोग घडला आहे. ट्रस पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांमध्ये राणी एलिझाबेथ यांचे निधन झाले. त्या ब्रिटनच्या सिंहासनावर सर्वाधिक काळ राहिलेल्या सम्राज्ञी होत्या, तर आता ट्रस यांची सर्वात कमी काळ (४५ दिवस) पंतप्रधानपदी राहिलेल्या नेत्या म्हणून इतिहासात नोंद झाली आहे. त्यांच्याखालोखाल जॉर्ज कॅनिंग यांची कारकीर्द ११९ दिवसांची होती. ८ ऑगस्ट १८२७ रोजी पंतप्रधान असताना त्यांचे निधन झाले होते.
लिझ ट्रस यांनी राजीनाम्यानंतर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘‘आपण जी आश्वासने दिली होती, ती सध्याच्या स्थितीमध्ये पूर्ण करू शकले नाही, त्यामुळे पंतप्रधानपदाचा राजीनामा देत आहे’’, असे त्यांनी म्हटले आहे. जेव्हा मी पंतप्रधान बनले त्यावेळी देशात आर्थिक स्थिरता नव्हती. देशातील नागरिकांना वीजबिल कसे भरायचे याची चिंता होती. आम्ही करकपातीचे स्वप्न पाहिले होते. मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया रचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वर्तमानात ते शक्य नसल्याने राजीनामा देत आहे, असे त्या म्हणाल्या. यूगव्ह या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार हुजूर पक्षातील ५३० सदस्यांपैकी ५५ टक्के लोकांनी लिझ ट्रस यांनी राजीनामा द्यावा, असे संकेत दिले होते, तर अन्य काही सर्वेक्षणांतूनही लिझ ट्रस यांनी राजीनामा द्यावा, असे संकेत मिळत होते. हुजूर पक्षाचे नेतेदेखील त्यांच्याविरोधात संतापले होते. लिझ ट्रस यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी संसदेत अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामध्ये त्यांनी करवाढ आणि महागाईला रोखणाऱ्यासाठी पावले टाकली होती. मात्र, सरकारने ती तातडीने मागे घेतली होती. लिझ यांनी पंतप्रधानपद स्वीकारले होते, त्यावेळी ब्रिटनची जनता महागाईचा सामना करत होती. लिझ ट्रस यांच्याकडून त्यांना फार मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होता.
सत्तेत येताना लिझ ट्रस यांनी करकपातीचे गाजररूपी आश्वासन दिले होते. लिझ ट्रस यांची पंतप्रधानपदी कारकीर्द ही ब्रिटनच्या इतिहासात सर्वात अल्पजीवी ठरली आहे. शपथ घेतल्यानंतर अवघ्या ४५ दिवसांत त्यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र या काळात ब्रिटनने प्रचंड आर्थिक आणि राजकीय उलथापालथ पाहिली. या घटनाच ट्रस यांच्या गच्छंतीला कारणीभूत ठरल्या. मात्र याची सुरुवात त्यांच्या निवडीच्या कारणापासूनच झाली होती. बोरीस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर सत्ताधारी हुजूर पक्षात झालेल्या निवडणुकीमध्ये आधीच्या सर्व फेऱ्यांमध्ये अर्थमंत्री ऋषी सुनक आघाडीवर होते, तर ट्रस दुसऱ्या क्रमांकावर होत्या. मात्र अखेरच्या फेरीत ट्रस यांनी सुनक यांना मात दिली. याचे मुख्य कारण अखेरच्या फेरीत पक्षाच्या सर्वसामान्य सभासदांनी मतदान केले. ट्रस यांनी पंतप्रधान झाल्यास मोठ्या करकपातीचे आश्वासन दिले होते, तर अशी करकपात अर्थव्यवस्थेला धोका ठरेल, असा इशारा सुनक यांनी दिला होता. मात्र ट्रस यांच्या घोषणेला भुलून त्यांना पक्षाने निवडून दिले. ही हुजूर पक्षाची सर्वात मोठी चूक ठरली.
अनेकदा चांगले राजकारणी आपल्या काही चुकीच्या निर्णयाने तोंडघशी पडलेले दिसले आहेत. अवास्तव, खोटी आणि अवाच्या सव्वा आश्वासने देण्याच्या नादात आपण चुकीची पावले टाकत आहोत, याचे भान भल्याभल्यांना राहत नाही. लिझ ट्रस यांचेही तसेच झाले आहे. सत्तेत येताच ट्रस यांनी ‘छोटा अर्थसंकल्प’ सादर केला. अर्थमंत्री क्वासी क्वारतेंग यांच्या करवित्यांनी कररचनेत मोठे बदल केले. मात्र याचा उलटा परिणाम झाला. श्रीमंतांना करमाफी द्यायची, तर उद्भवणाऱ्या महसूल तुटीचा खड्डा भरण्यासाठी निधी कुठून आणायचा, याचे नेमके उत्तर ट्रस-क्वारतेंग यांच्याकडे नव्हतेच. आधीच कोरोना आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे मंदीचे सावट असताना या घोषणांमुळे शेअर बाजार पुरते गडगडले आणि पौंड ऐतिहासिक रसातळाला गेला. त्यामुळे ट्रस यांच्यावरील पक्षाचा विश्वासच उडाला. विशेषत: उथळ आणि अपरिपक्व धोरणांमुळे ब्रिटनची अर्थव्यवस्था गडगडल्यानंतर ट्रस यांनी स्वत:च्या बचावासाठी प्रथम आपल्या अर्थमंत्र्यांचा बळी दिला. वॉशिंग्टनमध्ये अन्य देशांच्या अर्थमंत्र्यांसोबत बैठकीला गेलेल्या क्वारतेंग यांना ट्रस यांनी लंडनला बोलावून घेतले आणि त्यांची हकालपट्टी केली.
खरं म्हणजे आपणच आखलेली धोरणे राबविणाऱ्या अर्थमंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखविल्याने ट्रस यांच्या तकलादू राजकारणाचा फोलपणा उघड झाला. एव्हढे करूनही ट्रस यांचा पाय खोलातच गेला. पक्षाच्या घटनेनुसार, आता पुन्हा नेतेपदाची निवडणूक घ्यावी लागणार आहे. २८ ऑक्टोबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे ट्रस यांनी जाहीर केले. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत ट्रस यांचे प्रतिस्पर्धी ऋषी सुनक यांचे नाव आता अर्थातच आघाडीवर आहे. सुनक यांची निवड झाल्यास ते ब्रिटनचे भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान होतील. माजी पंतप्रधान बोरीस जॉन्सन देखील रिंगणात उतरण्याच्या तयारीत असले तरी त्यांना फारसा पाठिंबा मिळण्याची शक्यता नाही. शिवाय पेन्नी मोरडाऊंट, सुएला ब्रेव्हरमन आणि संरक्षणमंत्री बेन वॉलेस हेदेखील पुन्हा स्पर्धेत उतरू शकतात. एकूणच जनतेला दिलेली अवास्तव आश्वासने पूर्णत्वास न आल्याने लिझ यांनी स्वपक्षाबरोबरच सर्वांचाच विश्वास ‘ट्रस्ट’च गमावल्याने पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याची नामुष्की त्यांच्यावर आली, असे म्हणायला हवे.