डॉ. मिलिंद घारपुरे
एका टुकार चैनलवरचा तितकाच टुकार हास्यविनोदाचा कार्यक्रम. आचरटपणा अंगविक्षेप, सुमार अभिनय (?) टॉप ऑफ दॅट म्हणजे आतड्याला हसून पिळ पडतोय असे भासवून, ओढून-ताणून किंचाळणारे, त्यांच्यापेक्षा जास्त आचरटपणा करणारे जज किंवा जजीण. एका प्रसंगातील संवाद…
“मुझे आज के आज पाच हजार रुपये चाहिये.” – ती… “मेरी जान, मोहोब्बत है तुम से, चाहे तो मेरी किडनी मांग लो… पैसा क्या चीज है!!…” – तो.
त्याच्या पुढचं काहीही ऐकणं किंवा बघणं अशक्य होतं.
पण एक मजेशीर विचार, थोडा गंभीर. पण खास करून प्रेमाच्या आणाभाका, सात जन्मोका प्यार वगैरे घेणाऱ्यांसाठी. स्वतःचा महत्त्वाचा अवयव, अस्तित्वाचा भाग. आमच्या वैद्यकीय भाषेत Vital Organ. त्याशिवाय जगणे अशक्य. असा आत्यंतिक महत्त्वाचा असलेला अवयव, सहजपणे अगदी सहजपणे कोणासाठी कापून काढून द्यायला तयार व्हाल??? तेही प्रेमासाठी !!
…तेव्हाच शक्य आहे, जेव्हा अपेक्षाविरहित समर्पणाची आदराची भावना त्या समोरच्या व्यक्तीसाठी असेल तरच. प्रेम म्हणजे तरी काय? समर्पण… मग राधा-कृष्ण असो नाहीतर हीर रांझा. एकमेकांत विरघळून गेलेलं अस्तित्व म्हणजे प्रेम. बाकी सगळं तत्कालीन पडलेला, “मोह आणि फक्त मोह… देहाचा.
…तर कधी कोणाला असं वाटलं…” मुझे उससे कयामतकी हद तक प्यार है”… वगैरे वगैरे तर त्याने/तिने स्वतःला विचारावं. तुम्ही त्याला / तिला तुमची “किडनी” काढून देऊ शकता? होकार यायला किंचितसा जास्त वेळ लागला, तर समजा… नाहीये ते ‘प्रेम’ वगैरे.
कधीच वेळ येऊ नये कोणालाच अशी परीक्षा देण्याची किंवा घेण्याची… कारण… चांद तारे आणून देण्यापेक्षा नक्कीच अवघड असेल ती!!