पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज ‘रोजगार मेळावा’ या १० लाख कर्मचाऱ्यांच्या नोकरभरती मोहिमेचा शुभारंभ झाला. या समारंभात, देशभरातील ७५ हजार नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. पुण्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
राज्यसभा सदस्य प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, टपाल सेवा, पुणे क्षेत्राच्या संचालक सिमरन कौर, पुणे क्षेत्राचे पोस्ट मास्टर जनरल, रामचंद्र जायभाये देखील यावेळी उपस्थित होते. भारतीय टपाल विभाग, पुणे कार्यालयाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आपले मनोगत व्यक्त केले.
भारत सर्व क्षेत्रात विकसित व्हावा, हा पंतप्रधान यांचा प्रयत्न आहे. भारत आज आर्थिक क्षेत्रात सुरक्षित आहे, हा विश्वास पंतप्रधान देत आहेत, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.
आजचा कार्यक्रम आगळावेगळा आहे. ७५ हजार व्यक्तींच्या माध्यमातून ७५ हजार कुटुंबे जोडली गेली आहेत, असे सांगून भारताला मोठे करण्यात सरकारी सेवेत येणाऱ्यांचा मोठा हातभार आहे. प्रामाणिक सेवा देणे आपले कर्तव्य आहे, याची जाणीव राणे यांनी उपस्थित नवनियुक्त कर्मचाऱ्यांना करून दिली.
देशासाठी, कुटुंबासाठी योगदान देण्यासाठी नोकरी आवश्यक ठरते, अशी भावना व्यक्त करून राणे यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी यांना नवीन सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
नारायण राणे पुढे म्हणाले की, पंतप्रधान आम्हाला दर आठवड्याला देशाच्या प्रगतीसाठी, नागरिकांसाठी काय करता येईल यावर मार्गदर्शन करतात. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्ही आमच्या सोबत या, भारत आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण करूयात. आर्थिक क्षेत्रात दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आलो आहोत, तिसऱ्या आणि त्यानंतर पहिल्या स्थानावर जायचा प्रयत्न करू, असे आवाहन राणे यांनी केले. राणे यांनी उत्तम कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल पुणे टपाल विभागाचे अभिनंदन देखील केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
पंतप्रधान मोदी यांच्या, युवकांना रोजगाराच्या संधी प्रदान करण्याच्या तसेच नागरिकांच्या कल्याणाप्रति असलेल्या कटिबद्धतेची पूर्तता करण्याच्या दृष्टीने, हे एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशांनुसार, सर्व मंत्रालये आणि विभागांमध्ये असलेल्या मंजुरीप्राप्त रिक्त जागा भरण्याचे काम मिशन मोडवर सुरु झाले आहे. देशभरातून निवडले गेलेले नवनियुक्त कर्मचारी, ती सुलभ आणि तंत्रज्ञानयुक्त करण्यात आली आहे.