मुंबई (वार्ताहर) : दिवाळीतील सुट्टीच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशाची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट पाचपट महागले आहे. त्यामुळे आता प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकीटसाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू असेल.
नियमित प्लॅटफॉर्म तिकीटासाठी प्रवाशांना दहा रुपये मोजावे लागतात. मात्र आता दिवाळीत वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीटांच्या दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ शनिवारपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच १० दिवसांसाठी केली आहे. त्यामुळे आता मुंबईतील सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या रेल्वे स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीटांची किंमत १० रुपयांऐवजी ५० रुपये इतकी असेल.
मध्य रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वेच्याही आठ स्थानकांतील प्लॅटफॉर्म तिकीटाच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल, दादर, बोरिवली, वांद्रे टर्मिनस, वापी, उधना आणि सूरत या स्थानकातील प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत वाढवण्यात आली आहे. या स्थानकांवरील तिकिटंही १० रुपयांवरून ५० रुपये असे करण्यात आले असून ३१ ऑक्टोबरपर्यंत ही वाढ लागू असेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.