देशातील सर्वात म्हणजे १४० वर्षे जुन्या अशा काँग्रेस पक्षाची सध्या जी वाताहत झाली आहे ती पाहिली असता, आता हा पक्ष पुन्हा उभारी घेणे शक्य नाही, असेच वाटत आहे. कारण या पक्षासमोर भारतीय जनता पक्षासारख्या प्रचंड बलशाली अशा पक्षाचे आणि केवळ या पक्षातीलच नव्हे, तर जगातील बलवान नेता अशी ज्यांची ख्याती आहे, त्या नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी अमित शहा यांचे तगडे आव्हान उभे ठाकले आहे. एकेकाळी संपूर्ण देशात आणि जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये ज्या पक्षाची अविरत सत्ता होती, त्या काँग्रेस पक्षाचा भाजपने उभारी घेतल्यानंतर पार बोऱ्या उडाला. म्हणजे २०१४ नंतर देशातील काही हाताच्या बोटांवर मोजता येतील, इतक्याच राज्यांमध्ये शंभर वर्षांची परंपरा सांगणाऱ्या या पक्षाची सत्ता शिल्लक असून जवळजवळ सारा देश भाजपने व्यापला आहे, अशी सध्याची स्थिती आहे. त्यातच गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाबाबतचा वाद मिटत नव्हता. या जुन्या पक्षाला आतापर्यंत गांधी-नेहरू घराण्याच्या वारसदाराच्या करिष्म्याने तारले, असेच म्हणावे लागेल. पण सोनिया गांधी यांनी प्रकृतीच्या कारणास्तव अध्यक्षपदाच्या जोखडातून मुक्त करण्याची मागणी केल्यानंतर काही काळ त्यांचे पुत्र राहुल गांधी यांचे नाव अध्यक्षपदासाठी अग्रणी होते. पण त्यांची जनमानसातील छबी काँग्रेस पक्षाला तारण्यासाठी उपयुक्त ठरणार नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी-वाड्रा यांना पुढे आणण्याचा प्रयत्न पक्षातर्फे करण्यात आला. त्यासाठी प्रथम उत्तर प्रदेश राज्याची जबाबदारी प्रियंका गांधी यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशच्या निवडणुका लढविण्यात आल्या. पण त्यात पक्षाची कामगिरी फारच सुमार झाली आणि काँग्रेसची सूत्रे प्रियंका यांच्या हाती जाण्याची शक्यता पार धूसर झाली. देशातील जुना पण अध्यक्षच नसलेला दिशाहीन पक्ष अशी अवस्था गेली काही वर्षे या पक्षाची झाली होती. त्यातच गांधी कुटुंबीयांतील कोणीही अध्यक्षपदी असणार नाही, असे राहुल गांधी यांनी जाहीर केले होते. त्यामुळे गांधी घराण्याबाहेरील अध्यक्षपदासाठीच्या नेत्याचा शोध सुरू झाला होता आणि पक्षांतर्गत लोकशाहीचा डंका पिटत या पक्षाच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक जाहीर झाली.
उत्तरेत स्थापन झालेल्या या पक्षाने देशभर जरी सत्ता गाजवली असली तरी वाताहत झालेल्या या पक्षाच्या अध्यक्षपदाकरिता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव निश्चित झाले होते. पण राजस्थानमधील मुख्यमंत्रीपदावरून त्यांनी नेतृत्वालाच आव्हान दिल्याने अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव मागे पडले. अखेर १७ ऑक्टोबरला मल्लिकार्जुन खर्गे विरुद्ध शशी शरूर या दक्षिणेतीलच दोन नेत्यांमध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची लढत झाली हे विशेष. सर्वांसाठी कुतूहल ठरलेल्या काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत कर्नाटकमधील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हे निवडून आले. खर्गे यांना ७,८९७ तसेच शशी थरूर यांना १,०७२ मते मिळाली. १८८५मध्ये स्थापन झालेल्या काँग्रेस पक्षाचे खर्गे हे ६२वे अध्यक्ष बनले आहेत. अध्यक्षपदी निवडून आलेले ८० वर्षीय खर्गे यांना पक्षाच्या बहुसंख्य प्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला हे निश्चित. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गांधी कुटुंबाचा कुणालाही पाठिंबा नाही, हे वारंवार सांगितले जात होते. मात्र खर्गे यांच्या सुचक-अनुमोदक यादीकडे पाहता पक्षश्रेष्ठींचा कल लक्षात येतो. त्यामुळेच या लढतीची केवळ औपचारिकता असल्याचे म्हटले जात होते. तसेच गांधी कुटुंबीयांचे उमेदवार म्हणून त्यांचा प्रचार झाला आणि त्यांना ही निवडणूक सोपी गेली. विशेष म्हणजे आतापर्यंत स…हा वेळाच काँग्रेस अध्यक्षपदाकरिता निवडणूक पार पडली आहे. इतर वेळी सहमतीनेच अध्यक्षांची निवड झाली आहे.
अध्यक्षपदाकरिता प्रत्यक्ष निवडणूक झाल्याने पक्षांतर्गत लोकशाहीनेच अध्यक्षांची निवड होते, असा दावा काँग्रेस नेते करू लागले आहेत. त्यामुळे २५ वर्षांनंतर पक्षाचे अध्यक्षपद गांधी घराण्याच्या बाहेरील व्यक्तीकडे आले आहे. या निवडणुकीत खर्गे यांना ९० टक्के मते मिळाली असून या निवडीनंतर कॉँग्रेसमधील अंतर्गत रचनेत बदल करण्यात येतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. गांधी परिवाराशी जवळीक आणि वरिष्ठाचे समर्थन यामुळे पक्षात त्यांचा विशेष दबदबा होता, हे निश्चित व कॉँग्रेस पक्षातील महत्त्वाचा नेता अशी त्यांची ओळख बनली आहे.
खर्गे हे नऊ वेळा आमदार, तर दोनदा लोकसभेवर निवडून आले आहेत. १९६०पासून ते राजकारणात आहेत. देवराज अरस यांच्यापासून कर्नाटकमधील बहुसंख्य काँग्रेस मंत्रिमंडळात त्यांनी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. मुख्यमंत्रीपदाने मात्र त्यांना नेहमीच हुलकावणी दिली आहे. इंदिरा गांधी यांच्यापासून त्यांनी पक्षसंघटनेत काम केले आहे. शांत, संयमी व्यक्तिमत्त्व, विरोधकांशी उत्तम समन्वय ही त्यांची बलस्थाने आहेत. दक्षिणेत कर्नाटकमध्ये काँग्रेसची स्थिती चांगली आहे. उत्तर भारतात काँग्रेस कमकुवत आहे. उत्तर भारतातून खर्गे यांच्या करिष्म्यावर काँग्रेसला मते मिळण्याची शक्यता फार कमी आहे. काँग्रेस पक्ष संघटनेत दीर्घकाळ कार्यरत असल्याने खर्गेंना बारकावे माहीत आहेत. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला प्रतिसाद मिळत आहे. हे असताना राजस्थानमध्ये मात्र नवे संकट उभे ठाकले आहे. अशा प्रकारे पक्षांतर्गत कुरबुरी ध्यानात घेऊन जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची मोट बांधून पक्षाला उभारी देणे ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळेच ८० वर्षीय खर्गे हे आगामी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे आव्हान उभे करतील काय, हा प्रश्न आहे. तसेच खर्गे अध्यक्ष झाल्याने काँग्रेसला ते कशी उभारी आणतात किंवा कार्यकर्त्यांमध्ये ते कशी जान फुंकतात, हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. म्हणजेच खर्गे नावाची बुटी आता गलितगात्र झालेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देईल का? हाच खरा प्रश्न आहे.