वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : क्रिमियामध्ये इराणी सैनिक रशियन सैनिकांना युद्ध लढण्याचे प्रशिक्षण देत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून रशिया-युक्रेनदरम्यान युद्ध सुरू आहे. या काळात रशियाने आपले हल्ले तीव्र करत युद्धात इराणची शस्त्रे वापरण्यास सुरुवात केली आहे.
व्हाइट हाऊसने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, रशियन सैन्याच्या मदतीसाठी क्रिमियामध्ये इराणी सैन्य पाठवण्यात आले होते. ते रशियन सैनिकांना ड्रोन चालवायला शिकवत आहेत. तेव्हापासून युक्रेनवरील हल्ले तीव्र झाले. वास्तविक, इराणने रशियाला कामिकाझे ड्रोन पाठवले आहेत. चार दिवसांपूर्वी म्हणजेच १७ ऑक्टोबर रोजी कीव्हवर ड्रोनने हल्ला केला होता.
यूएस डिफेन्स डिपार्टमेंट पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन केर्बी म्हणाले, क्रिमियामध्ये इराणी सैन्याची उपस्थिती युद्धात इराणच्या थेट सहभागाचा पुरावा आहे. ते रशियाला युक्रेनियन नागरिकांवर आणि पायाभूत सुविधांवर ड्रोन हल्ले करण्यास मदत करत आहेत. क्रिमिया हा तोच भाग आहे जो रशियाने २०१४ मध्ये काबीज केला होता.कीव्हवर इराणचा ड्रोन हल्ला, १७ ऑक्टोबर रोजी रशियाने इराणकडून खरेदी केलेल्या कामिकाझे ड्रोनने युक्रेनची राजधानी कीव्हवर हल्ला केला. या हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू झाला होता.
हल्ल्यात वापरण्यात आलेल्या कामिकाझे ड्रोनचे नाव शाहिद-१३६ असे होते. हे ड्रोन इराणचे सर्वात धोकादायक शस्त्र मानले जाते. या इराणी ड्रोनला आत्मघाती ड्रोन असेही म्हणतात. त्याचे वजन २०० किलो आहे. या ड्रोनची रेंज २५०० किमी आहे. १० ऑक्टोबर रोजी रशियाने राजधानी कीव्हसह नऊ शहरांवर ८३ क्षेपणास्त्रे डागली.
यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला होता. केर्च ब्रिजवर झालेल्या स्फोटाचा बदला म्हणून रशियाने हा मोठा हल्ला केला. ८ ऑक्टोबर रोजी युक्रेनने रशियाचा केर्च ब्रिज उडवून दिला. हा पूल रशियाला क्रिमियाशी जोडतो. २४ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धाच्या सुरुवातीला रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर मोठे क्षेपणास्त्र हल्ले केले. मात्र, युक्रेनकडून कडवी झुंज दिल्यानंतर रशियाने एप्रिलमध्ये कीव्हमधून सैन्य मागे घेतले. आता पुन्हा कीव्हवर हल्ले सुरू झाले आहेत.