Sunday, March 23, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणगणेशोत्सवातील लॉटरी घोटाळा प्रकरणात मनसेचे तीन पदाधिकारी अटकेत

गणेशोत्सवातील लॉटरी घोटाळा प्रकरणात मनसेचे तीन पदाधिकारी अटकेत

गैरव्यवहाराचा ठपका असलेले खेडचे माजी नगराध्यक्ष आणि मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर अडचणीत

खेड : गणेशोत्सवातील लॉटरी घोटाळा प्रकरणात मनसेच्या तीन पदाधिका-यांना खेड पोलिसांनी काल अटक केल्यानंतर आता मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यापाठोपाठ कार्यकर्त्यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे.

रस्ते आस्थापना जिल्हा संघटक मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख प्रसाद शेट्ये आणि केदार वणंजू या तिघांना पोलिसांनी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता या तिघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तर दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयात आज (२१ ऑक्टोबर) वैभव खेडेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून वैभव खेडेकर हे नॉट रीचेबल आहेत. गणेशोत्सवातील लॉटरी घोटाळा प्रकरणात वैभव खेडेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून रत्नागिरीचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक त्यांचा कसून शोध घेत आहेत.

मनसेचे राज्य सरचिटणीस आणि राजवैभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर सप्टेंबर महिन्यात खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. मनसेच्या वतीने गणेशोत्सव कालावधीमध्ये विनापरवानगी लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन करुन लोकांकडून पैसा गोळा केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद झाली होती.

अरबाज असगरअली बडे यांच्या तक्रारीवरुन खेड पोलीस ठाण्यात वैभव खेडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या लकी ड्रॉसाठी लोटे एमआयडीसीमधील कोणकोणत्या कंपन्यामधून किती रक्कम गोळा केली याबाबत चौकशी होण गरजेचे आहे, अशी मागणीही तक्रारदार अरबाज असगरअली बडे यांनी केली आहे.

दरम्यान, खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर यापूर्वीच गैरव्यवहाराचा आरोप ठेवत सहा वर्षांसाठी त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले होते. आता पुन्हा गणेशोत्सव स्पर्धेतील लकी ड्रॉ प्रकरणी खेडेकर अडचणीत सापडले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -