Tuesday, July 1, 2025

अपहरण झालेल्या पाच वर्षीय मुलीची दोन तासांत सुटका

अपहरण झालेल्या पाच वर्षीय मुलीची दोन तासांत सुटका

विरार (प्रतिनिधी) : पालघर येथील एका पाच वर्षाच्या मुलीचे पैशासाठी अपहरण करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी मोठ्या शिताफिने सदर मुलीची अवघ्या दोन तासात सुटका केली. दरम्यान आरोपीला गजाआड करण्यात आले असून पोलिसांच्या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.


१९ ऑक्टोबर रोजी पालघर हिला कमला पार्क माहीम रोड येथील वर्धमान सोसायटीत राहणाऱ्या पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार करण्यात आली होती. तसेच आरोपीकडून मुलीच्या वडिलांकडे एक लाख रुपयांच्या पैशांची मागणी करण्यात आली होती. यावेळी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या आदेशान्वये निता पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश पाटील, साहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांनी वेगवेगळी पथके तयार करून अपहरित मुलीचा शोध सुरू केला.


दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी याचा मोबाईल क्र. उपलब्ध करून सायबर सेल पालघर यांच्या मार्फत त्याचे लोकेशन काढले. यावेळी त्याचे लोकेशन उसर्णीम केळवा परिसरात दिसून आल्याने आरोपीला केळवा रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेऊन अपहरित मुलीची सुटका करण्यात आली. तर आरोपी हा मुलीच्या शेजारील इमारतीत राहणारा असल्याचे समोर आले. यावेळी त्याने चॉकलेटच्या बहाण्याने सदर मुलीचे अपहरण केले हेाते. मात्र पोलिसांच्या कामगिरीमुळे अवघ्या दोन तासामध्ये आरोपी गजाआड झाला.

Comments
Add Comment