पुणे (प्रतिनिधी) : राज्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अशात आता दिवाळीतही पाऊस पडणार का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. पण परतीचा पाऊस आता ओसरणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दिवाळीमध्ये पावसाचे संकट टळणार आहे. पण काही भागांत पाऊस कायम असणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये १० मिमी पाऊसाची शक्यता आहे. तर, इतर भागांत पाऊस बरसणार नाही असा अंदाज हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. परतीचा पाऊस लांबल्याने पुण्यासह राज्यातील इतर भागात होत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका सगळ्यांनाच बसत आहे.
ऐन दिवाळीत पुणे शहरात गेल्या आठवड्याभरापासून रात्रीच्या वेळेस मुसळधार पाऊस होत असून या पावसाने दिवाळीत खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तर याचा फटका हा मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांना देखील बसला आहे. येत्या दोन दिवसांत परतीचा पाऊस ओसरायला सुरूवात होणार आहे. पण राज्यातील काही भागात मात्र पावसाची अशीच स्थिती राहणार असल्याने पावसातच सर्व सामान्य नागरिकांना दिवाळी साजरी करावी लागणार आहे.
राज्यातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर व तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी परतीचा पाऊस दोन ते तीन दिवस असाच असणार आहे. तर राज्यातील इतर ठिकाणी परतीचा पाऊस ओसरणार आहे. परतीचा पाऊस हा राज्यातून २५ ऑक्टोबर पासून ओसरणार आहे.