इस्लामाबाद (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले आहे. इतर राष्ट्रांचे प्रमुख आणि परदेशी मान्यवरांकडून मिळालेल्या सरकारी भेटवस्तूंची बेकायदेशीररित्या विक्री केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानातील स्थानिक माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’चे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान हे पाच वर्षांसाठी संसदेचे सदस्य राहू शकणार नाहीत.
पाकिस्तानचे मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुल्तान रजा यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने तोषखाना प्रकरणात खान यांना दोषी ठरवले आहे. पंतप्रधानपदी असताना भेटवस्तूंशी संबंधित माहिती लपवल्याचा आणि काही वस्तू विकल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर आहे. सत्ताधारी आघाडी सरकारच्या खासदारांनी पाकिस्तान निवडणूक आयोगाकडे ७० वर्षीय इम्रान खान यांच्याविरोधात ऑगस्टमध्ये तक्रार दाखल केली होती. सरकारी तिजोरीतून (तोषखाना) सवलतीच्या दरात खरेदी केलेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेबाबत खुलासा न केल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी खासदारांनी केली होती.
खान यांच्यावर भ्रष्टाचारविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचंही आयोगाने म्हटले आहे. आयोगाच्या या निर्णयाला इस्लामाबाद न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असे पीटीआयचे महासचिव असद उमर यांनी सांगितले आहे. खान यांच्या पक्षाने सोमवारी पार पडलेल्या पोटनिवडणूकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आयोगाचा हा निकाल पुढे आला आहे. संसदेच्या आठ जागांपैकी सहा जागांवर पीटीआयच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.