ठाणे : ठाण्यामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार झाल्यामुळे ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाण्यातील घंटाळी मंदिर रोड परिसरात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. दोन गटांमध्ये संपत्तीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घंटाळे परिसरात पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला. हा दोन गटांमधील वाद असण्याची शक्यता आहे. संपत्तीच्या वादातून हा प्रकार झाल्याचे समजते आहे. ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला, त्याच्यासोबत त्याचे सहकारीदेखील होते. आपल्या कार्यालयातून ते रात्रीच्या वेळी ते कंदील पुरवण्याचे काम करत होते. त्याचवेळी हल्लेखोर तिथे पोहोचले आणि गोळीबार केला. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घंटाळी परिसर हा नौपाडा या मध्यवर्ती भागामधील गजबजलेल्या भागांपैकी एक आहे. याच रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर राम मारुती रोड आहे. या भागामध्ये सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. घंटाळी मंदिराच्या मागील बाजूस शाळा असून काही अंतरावरच नौपाडा पोलीस स्थानक आहे. त्यामुळे अशा ठिकाणी गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत.
त्यानंतर ठाण्यातल्या वर्तकनगर परिसरातल्या येऊर परिसरातही गोळीबाराची घटना घडली. येऊर जंगलात गण्या काळ्या नावाच्या गुंडावर गोळीबार करण्यात आला आहे. गँगवॉरमुळे हा गोळीबार झाला असेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तर गोळीबार केल्यानंतर अज्ञात व्यक्ती पळून गेले. यामध्ये गुंड जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.