आमदाबाद : आमदाबाद (ता.कन्नड) येथे मंगळवारी रात्री शांताबाई गोटीराम बनकर (वय ८२) या वृद्धेचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर बुधवारी या महिलेवर स्मशानभूमी नसल्याने अंजना नदीपात्रात अंत्यविधी पार पडला. मात्र, अग्निदाह देताच जोरदार आलेल्या पावसामुळे नदीला पूर आला. यामुळे जोरदार वाहणाऱ्या पाण्यात मृतदेहाची हेळसांड झाली. स्मशानभूमी नसल्याने कुटुंबीयांना अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे मरणाने केली सुटका अन् पुराने छळले, अशीच काहीशी अवस्था या मृतदेहाची झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळी दहाच्या सुमारास येथील अंजना नदीपात्रात अंत्यविधी उरकण्याचे नियोजन सुरू होते. त्यासाठी नदीकाठी ट्रॅक्टरने जागा तयार करून सरणासाठी पुरेशी लाकडे व टायर रचून अग्निदाह देण्यात आला. मात्र, याचवेळी नदीच्या वरील भागात जोरदार पाऊस झाल्याने नदीला पूर आला. कुटुंबातील सदस्यांनी पुराच्या पाण्यात अक्षरशः जीव धोक्यात घालून आग विझणार नाही, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर तळाशी राहिलेली लाकडे जळत असताना पूर अचानक वाढला. त्यामुळे अखेर नाही व्हायचे तेच झाले. अग्नी दिलेले सरण विझून वाहून गेले. येथे स्मशानभूमी असती तर मृतदेहाची हेळसांड झाली नसती.
दरम्यान, नदीकाठी जुनी स्मशानभूमी असून दोन वर्षांपूर्वी नदीला मोठा पूर आल्याने तेथील नदीकाठचा भाग खचल्याने रस्ता वाहून गेला. त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही. गावची समस्या लोकप्रतिनिधीकडे मांडताच आमदार उदयसिंग राजपूत यांनी नवीन स्मशानभूमीसाठी पाच लाखांचा निधी मंजूर केला आहे. परंतु जागेअभावी हे काम रखडलेले आहे.