मुंबई : ‘वरळीच्या आमदारांना तर पेग, पेंग्वीन आणि पार्टी यापुढे काहीही दिसत नाही’, असा थेट हल्लाबोल भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला. तसेच आदित्य ठाकरे यांनी आजपर्यंत वरळीत मराठी साहित्य, खेळ, लोककला याचा एकही कार्यक्रम आयोजित केला नाही. त्यामुळे त्यांनी आमच्याबद्दल बोलूच नये, अशी टीकाही आशिष शेलार यांनी केली.
दिवाळी निमित्त मुंबईत होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देण्याकरिता भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमावरून वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
“जे दुसऱ्यांवर जळत राहतात, ते आनंदाचे दिवे लावू शकत नाहीत. त्यामुळे दुसऱ्याच्या अपयशावर ते सतत बोलत असतात आणि वर्तमान पत्रातून लिहित असतात. ते मुंबईत दिवे लावण्याच्या प्रकाश उत्सवाच्या कार्यक्रमात कुठे दिसत नाही”, असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला.
“वरळीच्या मैदावर आम्ही अतिक्रमण केल्याचा आरोप होतो आहे. मात्र, यात अतिक्रमणाचा कोणताही संबंध नाही. मुंबईकरांच्या मनात काय आहे, हे आम्हाला माहिती आहे. त्यांच्याशी आमची नाळ जुळली आहे, असे शेलार म्हणाले.
दरम्यान, काल उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीवरून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याबाबत शेलार यांना विचारले असता, “न्यायालयात असलेल्या प्रकरणावर मी भाष्य करणार नाही. मात्र, ज्यांनी ही याचिका दाखल केली आहे, ते मराठी आहेत. त्यामुळे मुंबईतील मराठी माणसाने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारल्याचे दिसून येते”, अशी प्रतिक्रिया शेलार यांनी दिली.