अभयकुमार दांडगे
मराठवाड्यात या वर्षी पावसाने जोरदार हजेरी लावली. परतीच्या पावसाने देखील चांगलीच हजेरी लावल्यामुळे मराठवाड्यातील धरणे ९०% पेक्षा अधिक भरलेली आहेत. यंदा अपेक्षित सरासरीच्या ११९ टक्के पाऊस झाल्याने मराठवाड्यात ८७५ प्रकल्पात ९० टक्के पेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मराठवाड्यातील परभणी वगळता सर्व जिल्ह्यांत ७०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे लघू, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पात उपलब्ध असलेला पाणीसाठा रब्बी पिकांची चिंता मिटविणारा आहे. मराठवाड्यासाठी ही आनंदाची बाब असली तरी यंदा परतीच्या पावसामुळे काढणीला आलेला सोयाबीन तसेच कापूस विक्रीसाठी आडतीवर न नेता थेट नदीला गेल्याची चिंताही अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
मराठवाड्यात सध्या ११ मोठ्या प्रकल्पात ५४० दलघमी इतका पाणीसाठा झाला आहे. हे प्रमाण ९७% इतके आहे, तर मराठवाड्यातल्या ७५ मध्यम प्रकल्पात ८५९ दलघमी इतका पाणीसाठा झाला असून हे प्रमाण ९१ टक्के आहे. गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात २२२ दलघमी इतका पाणीसाठा झाला असून हे प्रमाण ६४% आहे, तर मांजरा तेरणा नदीवरील २५ बंधाऱ्यात ६४ दलघमी पाणीसाठा झाला असून हे प्रमाण ८४% इतके आहे, तर मराठवाड्यातल्या सर्व ८७५ प्रकल्पात ७४६४ दलघमी पाणीसाठा झाला असून हे प्रमाण ९० टक्के इतके आहे.
मराठवाड्यातल्या ११ मोठ्या प्रकल्पात ७७% पाणीसाठा झाला आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण जायकवाडी या वर्षी जुलै महिन्यातच भरले होते. त्यामुळे जुलै महिन्यातच धरणातील पाणी सोडण्याची वेळ प्रशासनावर आली होती, तर येलदरी प्रकल्प, माजलगाव, उर्ध्व पेनगंगा, निम्न तेरणा, मानार, विष्णुपुरी, सीना कोळेगाव हे प्रकल्प १००% भरले आहेत, तर दूधना धरणात ७५ टक्के आणि मांजरा प्रकल्पात ७०% इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. निसर्गाची कृपा व अवकृपा यावर शेतकऱ्यांचे जीवन अवलंबून असते. कधी अवृष्टी, तर कधी अतिवृष्टी यामुळे अनेकदा शेतकऱ्यांच्या हाताला आलेले पीक वाया जाते. पाऊस चांगला झाला, तर पीक चांगले येते व पीक चांगले येऊन देखील कधी कधी परतीच्या पावसामुळे आडतीला घेऊन जाण्याच्या वेळेसच तोंडचा घास हिरावून न्यावा त्याप्रमाणे डोळ्यांदेखत उभे असलेले पीक आडवे होते. असाच अनुभव मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांना गेल्या पंधरा दिवसांत आला. सोयाबीन व कापूस आडतीवर गेल्यावर खिशात चांगले पैसे पडतील व दिवाळी गोड होईल, असे वाटत असतानाच परतीच्या पावसामुळे शेतातच उभे पीक आडवे झाले.
मराठवाड्यातील सर्व धरणांमध्ये समाधानकारक पाणी असल्यामुळे पुढील पिकांसाठी चांगले पाणी उपलब्ध होणार आहे. प्रत्यक्षात अनेक धरणांमध्ये जून व जुलै महिन्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणे पूर्णपणे भरली होती. एवढेच नव्हे तर या धरणांमध्ये अतिरिक्त पाणीसाठा जमा झाल्याने अनेकदा दरवाजे उघडून पाणी सोडावे लागले. हे पाणी मराठवाड्यातून तेलंगणा राज्यात सोडण्यासारखी देखील परिस्थिती नव्हती, कारण तेलंगणामधील धरणदेखील पूर्णपणे भरल्याने मराठवाड्यातील धरणांमध्ये झालेला हा अतिरिक्त पाणीसाठा थेट वायाच गेला, असेच म्हणावे लागेल.
मराठवाड्यातील वाढती लोकसंख्या पाहता व भविष्यात पाण्याचा होणारा वापर लक्षात घेऊन जी धरणे अस्तित्वात आहेत त्या धरणांमध्ये पाण्याची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. धरणांमधील पाणीसाठा वाढवायचा असेल, तर संबंधित धरणांच्या शेजारी असलेली जमीन संपादित करून त्या ठिकाणी भविष्यात अशी काही उपाययोजना करता येईल काय? या दृष्टीने सरकारकडून चाचपणी होणे आवश्यक आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात या सरकारकडून पुन्हा एकदा मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प मंजूर झाला असला तरी तो लवकरात लवकर व्हावा, या दृष्टीने प्रयत्न झाल्यास मराठवाड्यातील पाण्याची खूप मोठी समस्या दूर होईल.