नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रामनवमीला उसळलेल्या हिंसाचारात शेजाऱ्यांच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी मध्य प्रदेशमध्ये १२ वर्षीय मुलाला २.९ लाख रुपये भरण्याची नोटीस देण्यात आली आहे. तर मुलाच्या वडिलांना ४.८ लाख रुपये भरण्यास सांगितले आहे.
काळूराम हे शेतकरी आहेत. नोटीस मिळाल्यानंतर मुलाला धक्का बसल्याचे त्यांच्या पत्नीचे म्हणणे आहे. रामनवमीला उसळलेल्या हिंसाचारात दोघांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकसान भरपाईसाठीची ही नोटीस आहे.
शिवराजसिंह चौहान सरकारने मागील वर्षी डिसेंबरमध्ये प्रिव्हेंशन अॅण्ड रिकव्हरी ऑफ डॅमेजे टू पब्लिक प्रॉपर्टी अॅक्टला मंजुरी दिली होती. या कायद्यांतर्गत जे लोक दगडफेक किंवा अन्य दुसऱ्या कारणामुळे शासकीय आणि खासगी संपत्तीचे नुकसान करतात. त्यांच्याकडून नुकसान भरपाई घेतली जाईल. सरकारचे म्हणणे आहे की दंगा, दगडफेक आणि दुसऱ्यांच्या संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांना सोडले जाणार नाही.
काळूराम आणि त्यांच्या मुलाला पाठवलेल्या नोटीसमध्ये त्यांनी शेजाऱ्यांच्या मालमत्तेचे नुकसान केल्याचे म्हटलेले आहे. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल. १२ वर्षीय मुलगा आणि त्याचे वडील काळूराम यांच्यासह आणखी सहा जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. पण बाकी सगळे प्रौढ आहेत. याप्रकरणी शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली आहे.
या १२ वर्षांच्या मुलाची तक्रार करणारी एक महिला आहे. १० एप्रिल रोजी रामनवमीला झालेल्या हिंसाचारामुळे त्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रामनवमी हिंसाचाराच्या संदर्भात न्यायाधिकरणाकडे ३४३ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ३४ अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. सहा खटलेही निकाली काढण्यात आले. यातील चार हिंदू तर दोन मुस्लीम होते. आतापर्यंत ५० जणांकडून ७.४६ लाख वसूल करण्यात आले आहेत.