Monday, March 24, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यघराला शिस्त नसल्यास वाद उद्भवतात!

घराला शिस्त नसल्यास वाद उद्भवतात!

मीनाक्षी जगदाळे

लहान मुलांना शिस्त हवी, घरातल्या सर्व लोकांना शिस्त हवी तशीच संपूर्ण कुटुंबातील लोकांना पण एकत्रित शिस्त असेल, तर त्या घरात अनावश्यक वाद, कटकटी, भांडण आणि त्यातून वातावरण खराब होणे या गोष्टी टाळता येतात. घरातसुद्धा सुसूत्रपणा, ठरावीक पद्धत, नियम, दिनचर्या व्यवस्थित पाळली गेली, तर कौटुंबिक कलह निश्चित कमी होतील, यात दुमत नाही.

समुपदेशनाला आलेल्या पती-पत्नी, सासू-सुना, नंदा-भावजया, जावा-जावा, पालक आणि मुलं या सर्व नातेसंबंधांमध्ये अतिशय किरकोळ गोष्टींवरून घरगुती वाद होत असल्याचे लक्षात येते. वादाचे कारण प्रचंड किरकोळ क्षुल्लक असते. पण तेच तेच वाद सातत्याने घडल्यामुळे नि कोणीच बदलायला तयार नसल्याने नातेसंबंध टोकाचे कलुषित झालेले असतात आणि तुटण्यापर्यंत मजल गेलेली असते. खरं तर सगळ्यांच्याच घरात शिस्त बिघडून बेशिस्त सवयी अथवा चुकीचे वर्तन यामुळे वाद-विवाद, खटके या गोष्टी दैनंदिन जीवनात घडत असतात. काही ठिकाणी त्याचा अतिरेक होतो, बेशिस्तपणाचा खूपच कळस होतो आणि मग घरातील जी कोणती व्यक्ती अतिशय काटेकोर, शिस्तबद्ध आहे, त्याला खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो. घरातील कोणालाच जर दररोजच्या दैनंदिनी आयुष्यामधील चांगल्या सवयी नसतील, तर मात्र संपूर्ण घराचे ताळतंत्र बिघडले जाते. घरातील वस्तूंचा योग्य वापर, प्रत्येकाने वापरल्यावर वस्तू जागेवर ठेवणे, बिघडलेल्या वस्तू उपकरणे वेळचे वेळी दुरुस्ती करुन घेणे, घराची नियमित साफसफाई करणे अथवा करवून घेणे, घरातील अनावश्यक वस्तूंची वेळोवेळी विल्हेवाट लावणे, विजेचा, पाण्याचा, घरातील गाड्यांचा पेट्रोलचा, किराणा वस्तूंचा काळजीपूर्वक वापर करणे, कोणत्याही प्रकारची नासधूस न करणे, पाहिली आणलेली वस्तू पूर्ण वापरल्याशिवाय, संपल्याशिवाय नवीन न आणणे, पैसे जपून वापरणे, अनावश्यक खर्च न करणे यासारख्या अनेक बाबी कौटुंबिक शिस्तीत मोडतात. वेळेवर उठणे, वेळचे वेळी स्वयंपाक तयार असणे. नाष्टा, जेवण, चहा ठरलेल्या वेळेत होणे अथवा मिळणे, रात्री ठरावीक वेळेत झोपणे, सकाळी लवकर उठणे, वेळेत अंघोळी करणे इथपासून ते घरी कोणी पाहुणे, नातेवाईक, मित्रपरिवार आल्यावर त्यांना कुठे बसवायचं, त्यांना कितीवेळ द्यायचा, कोणी द्यायचा त्याला फक्त चहा द्यायचा की जेवणाचा आग्रह करायचा इथपर्यंत प्रत्येक घराची एक पद्धत असते. घरात आलेल्या व्यक्तीवर, पाहुण्यावर किती खर्च करायचा, कोणाकडे काही कार्य असल्यास किती आहेर करायचा इथपासून ते महिन्यातून किती वेळा हॉटेलमध्ये जेवायचं, किती वेळा बाहेर जाऊन सिनेमा पाहायचा, दिवसातला किती वेळ टीव्हीसमोर घालवायचा याचेही नियम असतात.

घरातल्यांशी संबंधित नातेवाईक, मित्र मंडळी येणारे जाणारे यांना आपल्या घरात किती मुक्त संचार करू द्यायचा, त्यांना कोणत्याही वस्तू वापरण्याची मुभा द्यायची अथवा नाही, त्यांना आपल्या घराच्या मान मर्यादेनुसार किती स्वातंत्र्य द्यायचे यावरूनही घरोघरी काटेकोर नियम असतात आणि ते योग्यच आहे. घरातील मुलांनी अभ्यास किती वेळ करणे अपेक्षित आहे, मुलांनी बाहेर खेळायला किती वेळ द्यायचा यावर पण घरोघरी वेळापत्रक असतंच. दररोज कोण काय खाणार, किती खाणार, कोण बाहेरून खाऊन येणार, कोणी पथ्याच काही खाणार, कोणी आजारी आहे किंवा कोणाचा उपवास आहे हे सर्व नियोजन करूनच स्वयंपाक अथवा कोणताही पदार्थ बनवणे जेणेकरून वेळ, श्रम आणि अन्न काहीच वाया जाणार नाही याचीसुद्धा घरोघरी काळजी घेतली जाते. घर स्वच्छ, सुंदर, निटनिटके, टापटीप ठेवणे आणि या सर्व गोष्टी सांभाळून, घराचं आर्थिक बजेट सांभाळून अनेक वेगवेगळ्या स्वभावाच्या, वेगवेगळ्या सवयीच्या माणसांनी एकत्र राहणे म्हणजे सगळ्यामध्ये प्रचंड मानसिक, भावनिक एकोपा समजूतदारपणा, एकमेकांची जाणीव, एकमेकांप्रती आदर, प्रेम आणि समन्वय असणे महत्त्वाचे आहे. समुपदेशनाला आलेल्या अनेक केसेसमध्ये यासारख्याच अनेक कारणांवरून घरोघरी वाद, चिडचिड, ताणतणाव वाढीस लागलेले दिसतात. सासूचे म्हणणे असते सून आंघोळीनंतर साबणसुद्धा जागेवर उचलून ठेवत नाही, पत्नीचं म्हणणं असते पती आंघोळ केल्यावर ओला टॉवेल बेडवर फेकून निघून जातो, स्वतःचे कपडे आस्ताव्यस्त ठेवतो, ज्येष्ठ लोकांचं म्हणणं म्हणणं असत रूममध्ये कोणी नसेल तरी नातवंड लाइट, फॅन, एसी सुरूच ठेवतात. टीव्ही तर दिवसभर कोणी पाहो न पाहो सुरूच असतो, मोठ्या आवाजात म्युझिक लावलं जात जे या वयात सहन होत नाही. काही ज्येष्ठ मंडळी सांगतात, मुलं दिवसासुद्धा लाइट लावून अभ्यास करतात, वीजबिल किती येतंय याची जाणीव नाही आजकालच्या मुलांना.

नणंदा म्हणतात, भावजयीला स्वयंपाकाचा अंदाज नाही वाटेल तेवढं करते आणि उरलं तर फेकते, दीर म्हणतो, माझे कपडे कधीच घडी करून जागेवर नसतात, तर अजून कोणी म्हणतं, घरातली बेडशीट अजिबात वेळोवेळी बदलली जात नाहीत, अंथरून पांघरून प्रत्येकाला वेगवेगळे ठरलेले आहे तरी माझं कधीच जागेवर सापडत नाही, तर कोण म्हणतं, उठल्यावर पांघरूणाच्या घड्याच कोणी करत नाही.

घरातील महिलांचे वादाचे विषयही अतिशय किरकोळ स्वरूपाचे असतात पण माघार घ्यायला कोणीच तयार नसते. घरातीत सर्वच महिलांसाठी स्वयंपाकघर हा मूळ अस्तित्वाचा, सन्मानाचा आणि हक्क, अधिकार दाखवण्याचा विषय! आपल्या स्वयंपाकघरात इतर कोणत्याही स्त्रीने केलेली ढवळाढवळ, लुडबूड सहन करतील, अशी महिला लाखात एक! जिथे सासू-सुनांना रोज एकमेकींशी ताळमेळ घालणे कठीण जाते तिथे इतरांच काय निभावणार? स्वयंपाकघरात प्रत्येक गोष्ट कशी आपल्याच मनाप्रमाणे हवी यावरून पराकोटीला गेलेले वाद नि त्यामुळे समुपदेशनासाठी यावे लागलेली प्रकरणे हाताळताना लक्षात येते की, घरातील सगळ्यांचा एक विचार, एक पद्धत, एकंदरीत ताळमेळ किती महत्त्वाचा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -