ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहरात डेंग्यूचा ताप पुन्हा डोके वर काढत असल्याने महापालिकेची आरोग्य यंत्रणा सावध झाली आहे. डेंग्यूचा प्रत्येक संशयित रुग्ण रूग्णालयात दाखल झालाच पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे. त्यांच्यासाठी वॉर्ड कायम उपलब्ध पाहिजेत. सध्या तीन सक्रिय रुग्ण असले तरी गाफील राहता येणार नाही. आठवडाभरातील संशयित रुग्णांचा, कोविड काळात करत होतो तसाच दैनंदिन पाठपुरावा ठेवावा, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.
त्याचबरोबर, रुग्णांचे मॅपिंग करावे म्हणजे कोणत्या भागात प्रार्दूभाव आहे हेही कळू शकेल. त्यानुसार डासांची उत्पत्तीस्थाने शोधून ती नष्ट करण्यास मदत मिळेल. नियमित औषध फवारणी करावी, तसेच घरोघरी जाऊन तपासणी करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आली आहे. रुग्णाला प्लेटलेट्स, रक्त चाचण्या करण्यासाठी हॉस्पिटलबाहेर पाठवायचे नाही. त्याचा खर्च रुग्णांवर टाकायचा नाही, अशा स्पष्ट सूचना आयुक्त बांगर यांनी दिल्या.
सध्यस्थितीत डेंग्यू व मलेरिया या आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने विशेष काळजी घेण्यात येत आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे संशयित आणि निश्चित निदान केलेले ५ रुग्ण आणि मलेरियाचे ८८ रुग्ण आढळून आले होते. तर डेंग्यूचा व मलेरियाचा प्रत्येकी एक रुग्ण दगावला आहे. तसेच, ऑक्टोबर महिन्यामध्ये डेंग्यूचे निश्चित निदान केलेले ५ रुग्ण आणि मलेरियाचे ५९ रुग्ण आढळून आले होते.
त्या आनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रामध्ये औषध फवारणी आणि १८३३९ ठिकाणी धूर फवारणी करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील एकूण ४८७२० घरांची तपासणी केली असून त्यापैकी २९४ घरे दूषित आढळली आहेत. तसेच एकूण ६१८९४ कंटेनरची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ५६६ कंटेनर दूषित आढळले आहेत. त्यापैकी ३०३ कंटेनर रिकामे करण्यात आले असून सर्व दूषित कंटेनरमध्ये महापालिकेच्यावतीने किटकनाशक औषध फवारणी करण्यात आली आहे.