ब्रिस्बेन (वृत्तसंस्था) : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने आपल्या ‘टो क्रशर यॉर्करने’ अफगाणिस्तानचा फलंदाज रहमान उल्लाह गुरबाजला जखमी केले.
आफ्रिदीचा हा यॉर्कर इतका घातक होता की, गुरबाजच्या अंगठ्याला दुखापत झाली. टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यात बुधवारी हा प्रकार घडला. गुरबाजला त्याच्या सहकारी खेळाडूंच्या खांद्याची मदत घेत पॅव्हेलियनमध्ये जावे लागले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.
सामना संपल्यानंतर शाहीन अफगाणिस्तानच्या ड्रेसिंग रुममध्ये गुरबाजची प्रकृती जाणून घेण्यासाठी पोहोचला. अफगाणिस्तानच्या सलामीवीराशी तो बराच वेळ बोलला. पावसामुळे हा सामना रद्द झाला.
दिवसाच्या पहिल्या सराव सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानसमोर विजयासाठी १५५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. कर्णधार मोहम्मद नबीने १७ चेंडूंत ५१ धावांची अर्धशतकी खेळी खेळली. इब्राहिम झद्रानने ३५ धावा केल्या.