वाडा (वार्ताहर) : तालुक्यात सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर गाव पाड्यांवर `कही खुशी कही गमʼ पाहायला मिळाले. विजयी झालेल्या उमेदवारांकडून निघालेल्या मिरवणुकी दरम्यान काही ठिकाणी बाचाबाची झाली. तर दिनकरपाडा येथील काही अज्ञात व्यक्तीकडून ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेच्या पाण्याच्या दोन टाक्या फोडून संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेचा गावातील महिलांनी निषेध व्यक्त केला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नूकताचा वाडा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडाला. यामध्ये भाजपची सरशी झाल्याचे दिसून आले. तर अनेक जणांच्या पदरी निराशा आली. यामध्ये काही जणांकडून संबंधित हार पचवता आली नसल्याने त्याचा राग सरकारी मालमत्तेवर काढण्यात आला. दिनकर पाडा येथील पाण्याच्या टाक्या फोडून आपला संताप व्यक्त करण्यात आला. कोंढले ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन झाल्याने प्रस्तावितांना पराभव पचवता आला नसल्याने जाणूनबुजून हा प्रकार केला असल्याचा आरोप दिनकरपाडा गावातील महिलांनी केला आहे. या घटनेने ग्रामपंचायतीच्या मालमत्तेची मोठी हानी झाली आहे. विघ्नसंतुष्ट लोकांच्या या कृत्यामूळे महिलांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
दिनकरपाडा गावातील पाण्याच्या टक्क्यांच्या दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर करून महिलांना तत्काल पाणी दिले जाईल. शिवाय अज्ञात व्यक्ती विरोधात वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. -प्रकाश पाटील, ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कोंढले.