किशोर गावडे
मुंबई : मनसेने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर भांडुप पश्चिम येथील १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र भर रस्त्यावर पाईप टाकल्यामुळे पुन्हा एकदा वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. तसेच पादचा-यांना आणि शाळकरी मुलांनाही प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे महापालिका प्रशासनाने त्वरीत लक्ष देण्याची मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.
भांडुप पश्चिम येथील एस विभागातील नागरिकांना पाण्यासंदर्भात होत असलेल्या समस्येचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार आंदोलन करून निषेध व्यक्त केला होता. तसेच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्तांची भेट घेऊन यासंदर्भात नव्याने १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याबाबत आयुक्तांना एस विभाग कार्यालयात घेराव घालून चांगलेच खडसावले होते. निषेध व्यक्त करून निवेदनही देण्यात आलेले होते.
कायम मेटल स्वरूपाची नवीन पाईपलाईन जोडण्यात येईल, असे आश्वासन सहाय्यक आयुक्त अजितकुमार आबी यांनी अनेक वेळा दिले होते. मात्र मागील दोन महिन्यापासून तब्बल ७ वेळा जीआरपी जलवाहिनी फुटल्याने पालिका प्रशासनाचे अक्षरशः धिंडवडे निघाले होते. महिलांनीही तीव्र संताप व्यक्त करत प्रचंड आक्रोश केला होता.
यासाठी सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेला पाठपुरावा, दिलेला इशारा तसेच वेळोवेळी महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत वॉर्ड ऑफिसर तसेच पाणी खात्यातील अधिकारी यांनी आम्ही युद्ध पातळीवर लवकरच पाण्याची नवीन पाईपलाईन मेटल स्वरूपाची १२०० मिमी व्यासाची बदली करणार आहोत, असे आश्वासन दिले होते.
त्यानुसार १६ ऑक्टोबर रोजी रात्रीच संभाजी मार्केट परिसरात नवीन पाईप आणले होते. व भर रस्त्यावर टाकले गेले. त्यामुळे पुन्हा एकदा वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला आहे. वाहतुकीच्या कोंडीने नागरिक, शाळेतील मुले त्रस्त झाले आहेत.
प्रशासनाची हतबलता आणि वाहतूक पोलीस नसल्यामुळे सगळाच सावळा गोंधळ उडालेला आहे.
२०० मीटर लांबीच्या पाइप लाईनचे काम लवकरात लवकर पूर्णत्वास येईल, तसेच पाईपलाईन नवीन जोडणी करत असताना पाणीपुरवठा हा नेहमीसारखा सुरळीत असेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
जलवाहिनीच्या कामास प्रारंभ होत असताना वाहतुकीच्या दृष्टीने अडथळा येऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, असे आवाहन माजी नगरसेविका अनिषा माजगावकर व विभाग अध्यक्षा वैष्णवी सरफरे तारकर यांनी केले आहे.
दरम्यान, दैनिक प्रहार वृत्तपत्राच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल विभागातील नागरिकांनी होर्डिंग लावून ‘प्रहार’चे आभार मानले.