Friday, November 8, 2024
Homeमहामुंबईमहावितरणच्या भांडुप परिमंडलात वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम

महावितरणच्या भांडुप परिमंडलात वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम

सप्टेंबरमध्ये पकडली २ कोटी ४५ लाखांची वीजचोरी

भांडुप (वार्ताहर) : वीजवाहिनीवरील हानी कमी करण्यासाठी तसेच प्रामाणिक ग्राहकांना वीजचोरांमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी महावितरणच्या भांडुप परिमंडलचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, भांडुप परिमंडलात वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत, सप्टेंबर २०२२ पासून ते आतापर्यंत वीजचोरी करणाऱ्या ३३३ वीजचोरांविरुद्ध कारवाई करून जवळपास २ कोटी ४५ लाखांची वीजचोरी पकडण्यात आली आहे.

महावितरण आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते. ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीज पुरविण्यासाठी झटत असतात. परंतु, अशा बेकायदेशीररित्या वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांमुळे अधिकारी, कर्मचारी तसेच प्रामाणिक ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. ऐन दिवाळीच्या काळात आपल्याला अंधारात जावे लागू नये तसेच आपल्या विरुद्ध कारवाई होऊ नये म्हणून ग्राहकांनी प्रामाणिकपणे विजेचा वापर करावा.

भांडुप परिमंडलातील ठाणे, वाशी व पेण या मंडळ कार्यालयांतर्गत गेल्या महिनाभरापासून वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम सुरू आहे. ही मोहीम अधिक तीव्र होणार असून ठाणे, वाशी व पेण मंडळात अधीक्षक अभियंत्यांनी सप्टेंबर २०२२ पासून ३३३ जणांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. त्यातील १८४ प्रकरणात वीज कायदा-२००३ च्या कलम १३५ नुसार ११७.७ लाखांची, तर ८२ प्रकरणांत कलम १२६ नुसार १०५.१७ लाखांची वीजचोरी पकडली आहे. यामध्ये अनेक ठिकाणी मीटरशी छेडछाड करणे किंवा मीटर बायपास करणे आढळून आले आहेत. या शिवाय वीजतारांवर थेट आकडे टाकून २२.०९ लाखांच्यी वीजचोरीची ६७ प्रकरणे उघडकीस आली आहेत.

महावितरण भांडुप परिमंडलचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी वीजचोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा देऊन सर्व ग्राहकांना प्रामाणिकपणे वीज जोडणी घेऊन वीज वापर करण्याचे आवाहन केले असून ग्राहकांनी नियमितपणे वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -