नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सहकारी बँकांमध्ये खाती असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये पुण्यातील राजगुरूनगर सहकारी बँक आणि गुजरातमधील को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ राजकोट यांचा समावेश आहे. राजगुरूनगर सहकारी बँकेला चार लाख रुपये आणि को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ राजकोटला २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेकडून या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार राजगुरू सहकारी बँकेला व्याजदर आणि डिपॉझिटसंबंधी केंद्रीय बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी पकडण्यात आले आहे. तर को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ राजकोटने जागरुकता योजनेसंबंधी नियमांची अवहेलना करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय बँकेने हे पाऊल उचलले आहे.
आरबीआयने या बँकांची तपास करण्याचे आदेश दिले होते. त्याचा अहवाल समोर आल्यावर राजगुरूनगर सहकारी बँकेने मृत खातेधारकांच्या चालू खात्यामध्ये असलेली रक्कम त्यांच्या वारसांना सोपवली नव्हती. असा परिस्थिती वारसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. आरबीआयने बँकेला याआधी नोटीस पाठवली होती. मात्र लेखी जबाबाने आरबीआयचे समाधान झाले नाही, तसेच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने दंडात्मक कारवाई केली.
आरबीआयने याबाबत माहिती देताना सांगितले की, हा दंड बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ च्या कलम ५६, कलम ४६(४) आणि कलम ४७ए(१) (सी) अंतर्गत दोषी आढळल्याने ठोठावण्यात आला आहे. मात्र याबाबत आरबीआयने सांगितले की, यातील कुठल्याही देवाणघेवाणीचा ग्राहकांवर काहीही परिणाम होणार नाही.