अलिबाग (वार्ताहर) : पासपोर्ट कार्यालय सध्या ठाण्यात असल्याने परदेशात जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट मिळविण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अलिबागकडे रायगड जिल्ह्याची राजाधानी म्हणून पाहिले जात असल्याने हे कार्यालय अलिबागलाच असावे, अशी मागणी नागरिकांची होती. या मागणीला आता हिरवा कंदील मिळालेला असल्याने अलिबागमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु होण्याचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रायगडला औद्योगिक व पर्यटन जिल्हा म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यात दिवसेंदिवस नागरिकीकरण वाढत आहे. वेगवेगळ्या उद्योगधंद्यानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांना अन्य देशात जावे लागत आहे. रायगड जिल्हा हा ग्रामीण भाग असला, तरीही वेगवेगळ्या कामानिमित्त व कुटूंबियांसमवेत फिरण्यानिमित्त परदेशात जाण्याची संधी अनेकांना मिळते. त्यामुळे पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढते आहे. मात्र पासपोर्ट काढण्यासाठी ऑनलाईन प्रक्रीया पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट मिळविण्यासाठी ठाणे येथील पासपोर्ट कार्यालय गाठावे लागत आहे.
अलिबागपासून ते पोलादपूरच्या टोकापर्यंत असणाऱ्या नागरिकांना पासपोर्ट काढण्याच्या प्रक्रियेसाठी बरीच धावपळ करावी लागते. काही त्रुटी निघाल्यास पुन्हा ठाण्याला येजा करण्याची वेळ नागरिकांवर येते. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांची या त्रासातून सुटका करण्यासाठी अलिबागमध्येच जिल्ह्याच्या ठिकाणी पासपोर्ट कार्यालय असावे, अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. या मागणीचा गेल्या काही वर्षापासूनचा पाठपुरावा सुरुच होता. अखेर अलिबागमधील जिल्हा पोस्ट कार्यालयाच्या इमारतीमध्ये हे कार्यालय सुरु करण्याचे निश्चित झाले आहे. याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची याबाबत बैठकही झाली आहे. त्यानंतर त्या विभागातील अधिकाऱ्यांनी अलिबागला येऊन जागेची पाहणीही केली होती.
पासपोर्ट कार्यालय अलिबागमध्ये सुरु करण्यासाठी येत्या काही दिवसात अंतिम निर्णयासाठी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पासपोर्टचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील नागरिकांची पासपोर्टसाठी होणारी धावपळ थांबणार असून, पासपोर्ट कार्यालयाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.