नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी दिल्ली, हरियाणा, पंजाब, बिहारच्या पाटणा, राजस्थानमधील ४० ठिकाणी छापे टाकले. हे छापे दहशतवादी, गँगस्टर्स, अंमली पदार्थांचे तस्कर आणि भारत आणि परदेशातील नेक्ससचा खात्मा करण्यासाठी टाकण्यात आले आहेत.
एनआयएच्या आजच्या झडतीदरम्यान ६ पिस्तूल, एक रिव्हॉल्व्हर, एक शॉटगन आणि दारूगोळा एनआयएने जप्त केला आहे. याशिवाय ड्रग्ज, रोख रक्कम, गुन्ह्याची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, बेनामी मालमत्तेची कागदपत्रे, धमकीची पत्रे एनआयएने जप्त केली आहेत.
यापूर्वी १४ ऑक्टोबर रोजी ड्रोन डिलिव्हरी प्रकरणाच्या संदर्भात तपास यंत्रणेने जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यासह अनेक ठिकाणी शोध घेतला होता. एनआयएच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
या टोळ्या ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीच्या माध्यमातून गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी निधीही गोळा करत होत्या. त्यांचे संपूर्ण नेटवर्क संपवण्यासाठी एनआयएने आज फाजिल्का, फरीदकोट, मुक्तसर साहिब, मोगा, तरन तारण, अमृतसर, लुधियाना, चंदिगड, पंजाबमधील मोहाली जिल्ह्या, पूर्व गुरुग्राम, भिवानी येथे ५० ठिकाणी छापे टाकले. हरियाणातील यमुनानगर, सोनिपत आणि झज्जर जिल्हे, राजस्थानमधील हनुमानगढ आणि गंगानगर जिल्हे आणि द्वारका, बाह्य उत्तर, ईशान्य, उत्तर पश्चिम दिल्ली/एनसीआरमधील शाहदरा येथे छापे टाकण्यात आले.
गोल्डी ब्रार (कॅनडा), लॉरेन्स बिश्नोई, जग्गू भगवानपुरिया, वरिंदर प्रताप ऊर्फ कला राणा, कला जथेडी, विक्रम ब्रार, गौरव पटियाला ऊर्फ लकी पटियाला (याला आधी आर्मेनियामध्ये अटक करण्यात आली होती), नीरज बवानिया यांच्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. सकाळी कौशल चौधरी, टिल्लू ताजपुरिया, अमित डागर, दीपक कुमार, टिनू, संदीप, इरफान, पहेलवान, आशिम, हाशिम बाबा, सचिन भांजा या गँगस्टर्सच्या अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले.
मागिल ९ महिन्यांत सुरक्षा दलांनी १९१ ड्रोन पाकिस्तानमधून भारतीय हद्दीत घुसल्याचे पाहिले आहे, ही देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे. त्याचबरोबर देशात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यात दहशतवादी, गुंड आणि अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नेटवर्कमध्ये खोलवर कट रचला गेला आहे, त्याबाबत तपास यंत्रणा कठोर आहेत.