नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा १२वा हप्ता जारी केल्यानंतर आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे. मंत्रिमंडळाने गव्हाच्या एमएसपीमध्ये ११० रुपयांची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. यासह, २०२३-२४ साठी गव्हाचा एमएसपी प्रति क्विंटल २,१२५ रुपये झाला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
गव्हाशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाने मसूरच्या एमएसपीमध्येदेखील कमाल ५०० रुपये प्रति क्विंटल दर मंजूर केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०२२-२३ साठी ६ रब्बी पिकांची एमएसपी निश्चित करण्यात आली आहे. ज्यामध्ये गव्हासाठी ११० रुपये, बार्ली १०० रुपये, हरभरा १०५ रुपये, मसूर ५०० रुपये, मोहरी ४०० रुपये, तर करडईच्या एमएसपीमध्ये २०९ रुपयांची वाढ करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
बार्लीचा जुना एमएसपी १,६३५ रुपये होता. यामध्ये १०० रुपयांची वाढ करण्यात आली असून आता तो १,७३५ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जाणार आहे. हरभराचा जुना एमएसपी ५,२३० रुपये होता, ज्याच्या एएसपीमध्ये १०५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हरभऱ्याची नवीन एमएसपी ५,३३५ रुपये प्रति क्विंटल असणार आहे. मसूरचा जुना एमएसपी ५,५०० रुपये प्रति क्विंटल होता. ज्यामध्ये ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मसूराला ६,००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळणार आहे. याशिवाय मोहरीच्या एमएसपीत ४०० तर, सूर्यफुलाच्या भावात प्रति क्विंटल २०९ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, केंद्राने गहू, बार्ली, हरभरा, मसूर, मोहरी आणि सूर्यफूल या पिकांच्या नवीन किमान आधारभूत किमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने गव्हाच्या एमएसपीमध्ये ११० रुपये प्रति क्विंटलने वाढ केली आहे. त्यामुळे आता रब्बी हंगाम २०२३-२४ साठी गहू २,१२५ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जाणार आहे.