मुंबई (वार्ताहर) : भारतात सुरू असलेल्या फिफा १७ वर्षांखालील महिला फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. त्यात शाळकरी मुलांची उपस्थिती लक्षणीय आहे. पहिल्या आठवड्यात तब्बल १ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी विश्वचषक सामन्यांचा आनंद लुटला. नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. स्टेडियमवर झालेल्या सामन्यांना ६ हजार जणांची उपस्थिती होती.
फिफाचे स्पर्धा संचालक जायमे यार्झा म्हणाले की, फिफा वर्ल्डकपला भारतात मोठी पसंती मिळाली आहे. भुवनेश्वर (ओदिशा) आणि नवी मुंबई येथे (महाराष्ट्र) झालेल्या पहिल्या आठवड्यातील सामन्यांना हजारो मुले उपस्थित होती. डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर मुलांचा उत्साह उल्लेखनीय होता. गोलपोस्टच्या दिशेने मारलेला प्रत्येक चेंडू, तसेच गोल झाल्यानंतरचे त्यांचे सेलिब्रेशन अनोखे होते. गोल झाल्यानंतर नृत्य करून ते संबंधित संघांतील खेळाडूंना चिअर करताना दिसले. येथे फुटबॉलचा प्रचार आणि प्रसार वाढण्यासाठी फिफा १७ वर्षांखालील महिला फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरेल, असे जायमे यार्झा म्हणाले.
फिफा वर्ल्डकपला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल केंद्रीय युवा आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आनंद व्यक्त केला आहे. जागतिक स्पर्धेचा आस्वाद आणि आनंद शाळकरी मुलांना घेता यावा, यासाठी आम्ही राज्य सरकार आणि संबंधित महानगरपालिकांना विनंती केली होती. त्यांनी चांगला प्रतिसाद दिला, असे ठाकूर म्हणाले.