ठाणे (प्रतिनिधी) : कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्यानंतरच्या यंदा येणारी दिवाळी उत्साहात साजरी करण्याकडे नागरिकांचा कल आहे. असे असताना महागाई, शिवकाशी येथे चिघळलेला संप आणि पावसामुळे वाहतुकीवर झालेला परिणाम यामुळे यंदा फटाके ३० ते ५० टक्के महाग झाले आहेत. त्यामुळे धुमधडाक्यातली दिवाळी यंदा बजेटच्या बाहेर जाणार असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
दिवाळी जवळ आल्यावर कोपरीतील फटाक्याच्या दुकानात मोठीच गर्दी पहायला मिळते. पण यंदा अजून तसा माहोल काही पहायला मिळत नाही. त्यामुळे व्यापारी चिंतेत असताना दिवाळी फटाक्यांच्या किमतीही यंदा वाढणार असल्याने ग्राहक कोणत्या फटाक्यांना पसंती देतात, हे पहावे लागणार आहे. याबाबत मराठा फटाक्याचे विक्रेते आहुजा यांनी सांगितले की, शिवकाशी येथून फटाके येतात. पण यंदा तिथे तीन महिने संप चिघळल्याने त्याचा मोठाच फटका फटाका बाजारावर येत आहे. पाहिजे त्या प्रमाणात फटाक्यांची आवक होत नाही.
साधारणत: सप्टेंबर महिन्यात पावसाला परतीचे वेध लागतात. पण यंदा ऑक्टोबर अर्धा महिला संपला तरी पाऊस परतायचे नाव घेत नाही, त्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊन फटका व्यावसायिकांना बसत आहे. गेल्या काही वर्षात इंधनाचे दरही वाढलेले आहेत. त्यानेही फटाके महाग होत चालले आहेत. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांना अनेक राज्यात बंदी आहे. पण ज्या राज्यात त्याची समज नाही तेथून हे फटाके येत असतात त्यानेही फटाके महाग होत चालले आहे. एकूणात यंदा फटाके ३० ते ५० टक्के महाग झाले आहेत.
ठाण्यातील कोपरी भागात लक्ष्मी फायर वर्क्स, महाराष्ट्र फायर वर्क्स सारखी मोठी होलसेल फटाके विक्री करणारी दुकाने नवनवीन फॅन्सी आयटम घेऊन आले आहेत. ग्राहकांना प्रदूषणविरहीत आणि इकोफ्रेंडली फटाकेही खरेदी करता येणार आहे. शिवाय मल्टीशॉर्ट कलर फटाक्यांचाही ट्रेण्ड यंदा पाहण्यात येत आहे. हवेत उडून प्रकाश फेकणारे फटाके यंदा आकर्षणाचा बिंदू आहे. छोट्या फटाक्यांच्या माळांनाही चांगली मागणी आहे. फुलबाजे, बंदुका, टिकल्या यांचा ट्रेण्ड संपलेला नाही. धूर सोडणा-या सापगोळ्या पालक टाळतात, पण हे सगळे फटाके यंदा भलतेच महागले आहेत, त्यामुळे गोरगरीबांना यंदा हे फटाके वाजवणे दिवास्वप्नच ठरणार आहे.