नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऐन दिवाळीत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. येणारे वादळ हे ‘सीतरंग’ या नावाने ओळखले जाणार आहे. २० ते २१ ऑक्टोबरच्या दरम्यान हे चक्रीवादळ निर्माण होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पण त्या वादळाचे मार्गक्रमण कसे राहील, हे अद्याप निश्चित सांगता येणार नाही. मात्र येत्या २३ आणि २४ ऑक्टोबरच्या सुमाराला पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सध्या महाराष्ट्रात परतीचा पाऊस कोसळत आहे. दिवाळीत देखील पावसाचा जोर असण्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनदेखील हवामान विभागाने केले आहे. सध्या एकीकडे राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच शेती पिकांनादेखील याचा मोठा फटका बसला आहे. उभी पिके पाण्यात असल्याने हाती काहीच उत्त्पन्न येण्याची शक्यता नाही. अशातच पुन्हा हवामान विभागाने २३ आणि २४ ऑक्टोबरला राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे.
पूर्वी चक्रीवादळांना नावे दिली जात नव्हती. वादळांच्या तारखांवरूनच ती लक्षात ठेवली जात होती. पण यामध्ये अडचणी जाणवू लागल्या. त्यातच समुद्रात एकाच वेळी दोन किंवा त्याहून अधिक भागांत चक्रीवादळसदृश परिस्थिती उद्भवण्याची शक्यताही नाकारली गेली नाही. अशा परिस्थितीत तारखांचे गणित काहीसे कठीणच होत गेले. जागतिक स्तरावर वैज्ञानिकांनी चक्रीवादळांना नावे देण्याचे ठरवल्याची माहिती हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली.
बाहेरील देशांमध्ये वादळांना महिलांची नावे देण्यात आली. पण वादळाचा थेट संदर्भ हा विध्वंसाशी लावला जात असून, यामध्ये नकारात्मकताच जास्त येते म्हणून यावर आक्षेप घेतला गेला. मग चक्रीवादळांना दुसऱ्या नावाने संबोधण्यास सुरुवात झाली. चक्रीवादळाच्या नावांसाठी दक्षिण आशियायी राष्ट्रांचा एक गट तयार करण्यात आला आहे. देशांकडून वादळांच्या नावांचे पर्याय मागवण्यात येतात. या नावांची एक यादी तयार केली जाते. सध्याच्या घडीला तयार असणारी नावांची यादी ही इतकी मोठी आहे की, चक्रीवादळे आल्यास ३ वर्षे ही नावे पुरेशी असतील. चक्रीवादळांची नावे निर्धारित करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे पाळली जाणे महत्त्वाचे असते. यामध्ये कोणत्याही संवेदनशील नावांची निवड आता केली जात नाही.