भास्कर जाधवांवर भाजप नेते निलेश राणेंचा हल्लाबोल
संतोष सावर्डेकर
चिपळूण : भास्कर जाधव उद्या सिंधुदुर्गात येत आहेत. परंतु धास्तीने ते आजच आजारी पडतील. जर आलात तर राणेंच्या नादाला लागू नका, असा धमकीवजा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे. ते चिपळूण येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलत होते.
ज्या आमदार भास्कर जाधवांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर टिका केली, तेच मिमिक्री करणारे जाधव आता नारायण राणेंवर टिकेची झोड उठवून ठाकरेंचे गुणगान गात आहेत. ते ज्या तुरंबवच्या मंदिरात देवीचा जप करतात, त्याच मंदिरात पुजाऱ्यांना शिव्या घालतात, असा आरोपही निलेश राणे यांनी येथील भाजपच्या संवाद मेळाव्यात केला.
येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील ब्राम्हण सहायक संघात कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, विनायक राऊत व भास्कर जाधव यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे नावाचा कोरोना महाराष्ट्राला लागला होता. शिंदे फडणवीस सरकार आले आणि हिंदूंचे सण सुरू झाले. ठाकरे पायउतार झाले तेव्हा महाराष्ट्राने श्वास सोडला. अडीच वर्षात राज्याची वाट लावण्याचे काम त्यांनी केले. एक लाख एसटी कर्मचारी आझाद मैदानावर आंदोलन करीत होते, त्यावेळी त्यांना भेट द्यायला वेळ नव्हता. त्यांना कर्मचाऱ्यांचे शाप लागल्याचा टोला राणे यांनी लगावला. ठाकरे सरकारने अडीच वर्षे राणेंसह, राणा आणि किरीट सोमय्यांना त्रास दिला. ठाकरेंची सत्ता असतानाही आम्ही दबलो नाही. शिवसेना प्रमुख असताना राणेंनी पक्ष सोडला हे ठाकरेंनी कायम लक्षात ठेवावे. चाळीस वर्षे ज्यांनी शिवसेनाप्रमुखाची सेवा केली, शिवसेना पक्ष वाढवला त्यांनाच जर ते अशा पद्धतीने वागणूक देत असतील तर यांच्याकडे राहणार कोण? आज राणेंवर सातत्याने टीकेची झोड उठवली जाते. त्या आमदार जाधवांची कुंडलीच आमच्याकडे आहे. एकेकाळचे जाधवांचे खंदे समर्थक रामदास राणे यांच्याकडची माहिती उघड केली तर जाधवांचे कठीण होईल.
भास्कर जाधव शिवसेनेत तर त्यांचा मुलगा राष्ट्रवादीत. कट्टर शिवसैनिक असलेल्या उदय बनेंना बाजूला करून जाधवांच्या मुलाला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले. राजीनामा देऊन शिवसेनेत का प्रवेश केला नाही, असा सवालही राणे यांनी उपस्थित केला. तसेच भास्कर जाधव चिपळूण शहरात पुराच्या वेळी फिरत होता. मात्र याने लोकांना मदत केली नाही की विकासासाठी निधी आणला. याचा हिसाब किताब याच जन्मात करणार आम्ही पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही असे टीकास्त्र सोडले.
आमचे मुंबईतील घर पाडण्यासाठी ५० अधिकारी पाठवले. इतका हा कपटी माणूस तर दुसरीकडे सभ्यतेचा आव आणायचा इतका हा ढोंगी माणूस, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंवर टीका केली.
आपल्याला संघटनेची वेळोवेळी ताकद दाखवावी लागेल- शैलेंद्र दळवी
यावेळी भाजपा कोकण विभागीय संघटक शैलेंद्र दळवी यांनी आपल्या मनोगतात मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट २ हजार रुपये जमा होत आहेत. तर काँग्रेसच्या काळात १ रुपया जाहीर केला गेला तर जनतेला ५ पैसे मिळत होते. यावरून मोदी सरकार जनतेचे आहे हे लक्षात घ्या, असे स्पष्ट केले. चिपळुनात महापूर आला तेंव्हा सर्वात प्रथम भाजप कार्यकर्ता धावून आला. आता आपल्याला संघटनेची ताकद वेळोवेळी दाखवावी लागेल. भारत मातेविरोधात बोलणाऱ्यांना ठेवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे, असे शेवटी सांगितले.
परिमल भोसलेंची सेना नेत्यांवर टीकेची झोड
तर माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी विनायक राऊत व भास्कर जाधव यांच्यावर टीकेची झोड उठवली. पुढे ते म्हणाले की, महाविकास आघाडीने चिपळूण शहराचा बट्ट्याबोळ केला. महामार्ग चौपदरीकरण राऊंतामुळेच रखडले आहे, असा आरोप केला. येत्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊतला घरी बसवायचे असून भाजप नेते निलेश राणे यांना निवडून आणायचे आहे. तेंव्हा कार्यकर्त्यांनी पेटून काम केले पाहिजे, असे अवाहन केले. भास्कर जाधव यांच्यावर टीका करतांना ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार यांचे झाले नाहीत. ते उद्धव ठाकरेंचे कसे होणार? असा सवाल उपस्थित केला. गुहागरात किती उद्योगधंदे आणले? किती तरुणांना रोजगार दिला? याचे उत्तर भास्कर जाधवांनी द्यावे, असे आव्हानच दिले.
याचबरोबर माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, माजी नगरसेवक विजय चितळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचा निलेश राणे यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. तर शहरातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे राणेंनी स्वागत केले.
यावेळी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष निलम गोंधळी, भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, शहराध्यक्ष आशिष खातू, गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, माजी नगरसेविका सौ. रसिका देवळेकर, नुपूर बाचीम, संदीप सुखदरे, रवींद्र नागरेकर, खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे, मेहताब साखरकर, अजय साळवी, अनिल सावर्डेकर, संतोष मालप आदी उपस्थित होते. या मेळाव्याचे सूत्रसंचालन मंदार कदम यांनी केले.
यावेळी कोकण संघटक शैलेंद्र दळवी, रामदास राणे, नीलम गोंधळी, माजी नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे, विजय चितळे, गुहागर भाजपा अध्यक्ष निलेश सुर्वे, वसंत ताम्हणकर, शहराध्यक्ष आशिष खातू आदी मान्यवर उपस्थित होते.