विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेकडून निष्कासनाची कारवाई करण्यात येत असून अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण रोखण्यासाठी महानगरपालिकेकडून विविध कारवाया करण्यात येत आहेत.
प्रभाग समिती ‘सी’ चंदनसार अंतर्गत सर्व्हे नं.७२, हि.नं.२, सहकार नगर, विरार या ठिकाणी ‘जय मॉं जीवदानी’ या २५ सदनिका व १ गाळा असणाऱ्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम करणाऱ्या विकासकाला एमआरटीपी कायद्यान्वये महानगरपालिकेमार्फत नोटीस बजावण्यात आली होती. तरीही आजतागायत विकासकाने सदरील अनधिकृत बांधकाम निष्कासीत केलेले नाही. यामुळे महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग समिती ‘सी’ चे सहा.आयुक्त गणेश पाटील यांनी सदरील अनधिकृत इमारतीचे बांधकाम करणारे विकासक, जागेचे मालक व इतर यांच्यावर विरार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महानगरपालिका आयुक्त अनिलकुमार पवार, अति.आयुक्त आशीष पाटील यांच्या निर्देशानुसार तसेच अनधिकृत बांधकाम विभाग उप-आयुक्त अजित मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका क्षेत्रात होत असलेल्या अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण रोखण्यासाठी महानगरपालिकेकडून सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे.