Monday, October 20, 2025
Happy Diwali

ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणची सोलर रुफटॉप योजना

भांडुप (वार्ताहर) : महावितरणच्या छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळत आहे. सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीजबिलात मोठी बचत होऊन, नेटमिटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीज देखील विकत घेतली जाते. ग्राहकांच्या सोयीसाठी केंद्र शासनाने ‘नेशनल पोर्टल फॉर सोलर रुफटॉप’ चे अनावरण जुलै २०२२ मध्ये केले आहे. या पोर्टलवर ग्राहक देशभरातून कुठूनही सोलर रुफटॉपसाठी अर्ज करू शकतो.

पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन विविध राज्य आपल्या परीने अनेक उपाय अंमलात आणत आहेत. महावितरणने सुद्धा या मोहिमेत आपला हातभार लावण्यासाठी सौर रुफटॉप योजनेची घोषणा केली. ही योजना ग्राहकांसाठी फायद्याची असून, रोहित्रावरचा ताण ही कमी होतो. या योजनेला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रत्येक मंडळ, विभागीय, उपविभागीय कार्यालय तसेच एजन्सी प्रयत्न करत आहेत. महावितरणमध्ये, या योजनेची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे स्वतः सर्व परिमंडलातील मुख्य अभियंत्याशी पाठपुरावा करित आहेत.

या योजनेमधून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून वित्त सहाय्य देण्यात येणार आहे. रुफटॉप सौर योजनेमधून घरगुती ग्राहकांसाठी अटी व शर्तीसह १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येते. तसेच सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना २० टक्के अनुदान मिळणार आहे.

Comments
Add Comment