कीव्ह (वृत्तसंस्था) : रशियाने सोमवारी सकाळी युक्रेनची राजधानी कीव्हवर कामिकाझे ड्रोनने हल्ला केला. दरम्यान राजधानीत ४ स्फोट झाल्याचा अंदाज असून ७ महिन्यांनंतर रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचल्याचे दिसून येत आहे.
रशियाने केलेल्या या हल्ल्यात अनेक निवासी इमारतींचे नुकसान झाले आहे. राजधानीत आग आणि धुराचे लोट निर्माण झाले होते. या हल्ल्यात वापरण्यात आलेल्या कामिकाझे ड्रोनचे नाव शाहिद – १३६ असे असून हे ड्रोन इराणचे सर्वात धोकादायक शस्त्र मानले जाते. युक्रेन युद्धात आपली पकड मजबूत करण्यासाठी रशियन सैन्य इराणी ड्रोनच्या मदतीने हल्ले करत आहे. या इराणी ड्रोनला आत्मघाती ड्रोन असेही म्हणतात. त्याचे वजन २०० किलो आहे. या ड्रोनची रेंज २५०० किमी आहे. इराणी ड्रोन शहीद-१३६ चे लक्ष्य अचूक आहे. इराणी ड्रोनच्या माध्यमातून रशिया युक्रेनच्या रडार यंत्रणांना लक्ष्य करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान १० ऑक्टोबर रोजी रशियाने राजधानी कीव्हसह नऊ शहरांवर ८३ क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला होता. केर्च ब्रिजवर झालेल्या स्फोटाचा बदला म्हणून रशियाने हा मोठा हल्ला केला. ८ ऑक्टोबर रोजी युक्रेनने रशियाचा केर्च ब्रिज उडवून दिला. हा पूल रशियाला क्रिमियाशी जोडतो.
२४ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धाला ७ महिने पूर्ण झाले आहेत. युद्धाच्या सुरुवातीला रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर मोठे क्षेपणास्त्र हल्ले केले. मात्र, युक्रेनकडून कडवी झुंज दिल्यानंतर रशियाने एप्रिलमध्ये कीव्हमधून सैन्य मागे घेतले. आता पुन्हा कीव्हवर हल्ले सुरू झाले आहेत.