Wednesday, April 23, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखनवीन चिन्हांसोबत नवीन आव्हान!

नवीन चिन्हांसोबत नवीन आव्हान!

सीमा दाते

शिवसेनेत दोन गट झाल्यानंतर खरी शिवसेना कोणती यासाठी मोठे वाद झाले, गेले काही दिवस महाराष्ट्रात कोणाची शिवसेना खरी आणि कोणाची खोटी यावर मोठमोठी भाषणं, राडे झाले. उद्धव ठाकरेंची सेना खरी की एकनाथ शिंदेंची सेना खरी? यावर मोठा संघर्ष झाल्यानंतर अखेर निवडणूक आयोगानेच दोन्हीही गटाला शिवसेना नाव वापरण्यावर बंदी आणली. यावरून हे तर स्पष्ट झाले की, वारसा हक्काने देखील शिवसेना हे नाव उद्धव ठाकरेंना मिळाले नाही. दुसरीकडे निवडणूक आयोगाने धनुष्यबाणाचे चिन्हच काढून दोन्ही पक्षाला नवीन चिन्ह दिले. एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेला ढाल-तलवार तर उद्धव ठाकरेंच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मशाल. त्यामुळे आता नवीन चिन्हासह नवीन आव्हान देखील आहेत.

एकनाथ शिंदे यांनी आलेल्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले, कारण सुरुवातीपासूनच शिंदे गट हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना म्हणत होते आणि म्हणूनच आपण उद्धव गटापासून वेगळे झालो असल्याचे म्हणाले. महाविकास आघाडी केल्यानंतर शिवसेनाही बाळासाहेबांच्या विचारांची राहिलीच नसल्याची टीका ही शिवसेनेवर झाली आणि यामुळे एकनाथ शिंदे गटात आपण गेलो. त्यामुळे हीच बाळासाहेबांची शिवसेना असल्याचे शिंदे गटातील आमदारांनी सांगितले, त्यामुळे त्यांनी त्यांच्या गटाला ही बाळासाहेबांची शिवसेना हेच नाव मिळवले, तर दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळवल्यानंतर त्यांच्यावर अनेक टीका झाल्या. बाळासाहेबांनी काढलेल्या पक्षाला त्यांचे नाव काढून उद्धव ठाकरेंनी स्वतःचं नाव दिल्यामुळे राजकीय टीका तर त्यांच्यावर झाल्याचे पण अनेक शिवसैनिक देखील यामुळे नाराज असल्याचे पाहायला मिळाले.

बरं आता हे नवीन नाव आणि चिन्ह आगामी अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वापरणार आहे, त्यामुळे या निवडणुकीत या नवीन नावाचा किती फायदा उद्धव ठाकरे गटाला होतो हे पाहायला मिळेल. मात्र नवीन चिन्ह आणि नवीन नावाची आता दोन्ही ही पक्षासाठी नवीन आव्हान घेऊन आलेला आहे. एकतर उद्धव ठाकरे गटातून आमदार निघून गेल्यानंतर त्यांना डॅमेज झालेली शिवसेना पुन्हा उभी करण्याची नवीन संधी आहे. उद्धव ठाकरेंना स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी तसेच जे आमदार सोडून गेले, त्यांनी उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नव्हते, महाविकास आघाडीचे ऐकायचे असे सगळे आरोप खोडून स्वतःला पुन्हा शिवसैनिकांमध्ये मिसळून देण्याची नवी संधी चालून आली आहे. तर एकनाथ शिंदे यांनाही त्यांनी विचारांच्या वारसावर केलेली शिवसेना टिकवण्यासाठी आणि आमची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आहे, आम्ही हिंदुत्वासाठी भाजपसोबत आहोत हे सगळे म्हटल्यानंतर ते टिकवून ठेवण्यासाठीच आव्हान एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे आहे.

त्यातच अंधेरी पोटनिवडणूक येऊ घातली आहे. यात बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून उमेदवार नसला तरी इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना असा सामना पाहायला मिळत आहे, याठिकाणी भाजपने आपला आमदार दिला आहे. मात्र एकनाथ शिंदे गटाचा पाठिंबा हा भाजपच्या उमेदवार मुरजी पटेल यांना आहे, त्यामुळे शिवसेनेचे दोन गट आमने-सामने आहेत.

भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करतानाच मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. एकीकडे भाजपचे मोठे नेते आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मोठे नेते भाजपच्या उमेदवारांसोबत अर्ज भरायला होते, तर दुसरीकडे शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटकेंसोबत शिवसेना आणि महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार होते. खरं तर ही निवडणूक भाजप म्हणण्यापेक्षा बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्येच असल्याचे पाहायला मिळणार आहे, कारण गेले कित्येक वर्षं शिवसेनेच्या एका उमेदवाराला मतदान करणारे शिवसैनिक आता दोन गटांत विभागले गेले आहेत, जो पारंपरिक शिवसैनिक आहे. मात्र आता कोणाला मत देणार हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे, कारण २०१९ मध्ये दिवंगत रमेश लटके निवडणूक आले होते. त्यावेळी शिवसेना-भाजप युतीची मतं रमेश लटकेंना मिळाली होती, मात्र आता भाजपची मतं भाजप उमेदवाराला जाणार आहेत. पण त्यासोबतच शिवसेना दोन गटांत विभागल्यामुळे शिवसेनेची मतं देखील भाजप उमेदवाराकडेच जाणार आहेत, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मात्र तिथं एवढे मताधिक्क्यही नाही. यासाठी अंधेरी पोटनिवडणुकीचा गड कोण राखतो हे पाहण्यासाठी सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र या निवडणुकीवर दोन्ही गटांचे भविष्य अवलंबून आहे हे नक्की, कारण नंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत, राज्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्र असल्यामुळे पालिका निवडणुकीत दोघे एकत्र लढणार आहेत, यासाठी सध्या दोन्ही गटाला आपला पक्ष वाढवण्यासाठीच्या नवीन आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -