Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणदेवगड तालुक्यात सुरु होणार 'मत्स्य' विद्यालय

देवगड तालुक्यात सुरु होणार ‘मत्स्य’ विद्यालय

भाजप आमदार नितेश राणे यांनी दिली माहिती

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात आता खऱ्या अर्थाने निलक्रांती होणार असून रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरील देवगड तालुक्यात गिर्ये येथे मत्स्य महाविद्यालय सुरू होणार आहे. अशी माहिती भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली. कणकवली येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नितेश राणे पुढे म्हणाले, सर्वात जास्त मासेमारी कोकणात होते. तरीही मत्स्यविद्यापीठ विदर्भातील नागपूरला अशी आजवरची स्थिती होती. मात्र, शिंदे -फडणवीस सरकारने सिंधुदुर्गात मत्स्य महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलले आहे. २३ सप्टेंबर २०२२ रोजी संबधित खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मी मत्स्य महाविद्यालय सिंधुदुर्गात सुरू करण्याची एका पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानंतर तत्काळ राज्य सरकारने सकारात्मक हालचाली सुरू केल्या असून लवकरच सिंधुदुर्गात मत्स्य महाविद्यालय सुरू होईल.

हे महाविद्यालय डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाशी संलग्न असणार आहे. या महाविद्यालयासाठी २६ हेक्टर जागा आवश्यक होती. देवगड तालुक्यातील गिर्ये गावात जागा उपलब्ध झाली असून भारतीय कृषी अनुसंधान नवी दिल्ली यांनी सिंधुदुर्गात मत्स्यमहाविद्यालय सुरू करण्यास प्रथमदर्शनी सकारात्मकता दर्शवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ला या सागरी किनारपट्टीवर मासेमारी सुरू असते. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात कोकणावर सातत्याने अन्याय झाला. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून कोकण विकासासाठी असंख्य निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन निधी देण्याची माजी मुख्यमंत्री ठाकरेंनी पोकळ घोषणा केली होती. मात्र, शिंदे -फडणवीस सरकारने प्रत्यक्ष ५० हजार प्रोत्साहन निधी शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली आहे.

कोस्टल हायवेबाबत केंद्रीयमंत्री नारायण राणे केंद्राकडे पाठपुरावा करत आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्ह्यात नवीन रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहे. फोंडाघाट बाजारपेठेतील रखडलेले रस्ता रुंदीकरण शिंदे-फडणवीस सरकार येताच सुरू होत आहे. यासाठी निधी मंजूर झाला असून लवकरच फोंडाघाट बाजारपेठ रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरुवात होणार आहे. एकंदरीत शिंदे- फडणवीस सरकार आल्यावर कोकणच्या सर्वांगीण विकासाला सुरुवात झाली असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -