ठाणे (प्रतिनिधी) : अमली पदार्थ विक्री आणि सेवनास विरोध करणाऱ्या एका तरुणावर अमली पदार्थ माफियाने चाकू हल्ला केल्याची घटना मुंब्रा येथे घडली आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी एकास अटक केली आहे.
मुंब्रा येथील लेबेटू या ग्रुपकडून काही ड्रग्ज माफियांकडून ड्रग्जची विक्री केली जात होती. तसेच, खडी मशीन येथे रेव्ह पार्टीसदृश्य कृत्य सुरू होते. ही माहिती मिळताच रोशन हसन शेख यांनी खडी मशीन गाठून या नशेखोरांना विरोध केला होता. त्याचा राग मनात धरून रेहान ऊर्फ पचीस याने आपल्या साथीदारांसह रोशन यांना एकटे गाठून चाकूने वार केले. तसेच त्याच्याकडील सुमारे अठरा हजारांची रोकड लंपास केली. जखमी रोशन यांच्यावर बिलाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून रेहान यास तत्काळ अटक केली आहे. अधिक तपास सपोनि बोरसे हे करीत आहेत. तर अन्य फरारी आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, रोशन यांच्या कुटुंबीयांनी तत्काळ कारवाई केल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक, सपोनि कृपाली बोरसे यांचे आभार मानले असून अन्य आरोपींना अटक करण्याची विनंती केली आहे.