भारतीयांना क्रिकेट आणि राजकारण या दोनच विषयांची कमालीची आवड आहे. गर्भश्रीमंत असो अथवा फाटक्या खिशाचा नवकोटनारायण असो. क्रिकेट आणि राजकारण हे दोन्ही विषय प्रत्येक जण आवडीने चघळतच असतो. भारतीय महिला क्रिकेटने आशिया चषकावर आपले नाव कोरले. भारतीय महिला क्रिकेटची गेल्या काही महिन्यांपासून होत असलेली गरुडभरारी ही क्रिकेट क्षेत्रामध्ये करिअर करू पाहणाऱ्या मुलींसाठी प्रेरणादायी बाब ठरणार आहे. भारतीय महिला क्रिकेटमध्ये सध्या खेळत असलेल्या स्मृती मानधना, स्नेहा राणा, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंह, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज यांसह अन्य नावे आता भारतीयांच्या तोंडपाठ होऊ लागली आहेत. एरव्ही भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या तुलनेत महिला क्रिकेट संघावर आजवर अन्यायच झाला आहे आणि आजही काही प्रमाणात अन्यायच होत आहे. त्याला मुळात आपण भारतीयच कारणीभूत आहोत. माऊथ पब्लिसिटी, चर्चा, प्रायोजक, प्रसिद्धीचा झोत कायमच पुरुष खेळांडूवरच राहिलेला आहे. अगदी कालपरवा जन्माला आलेली मुले विनू मंकड, नबाब पतोडी, एकनाथ सोलकरपासून कपिलदेव, सुनील गावस्कर, तेंडुलकर तर सोडा कालपरवा आयपीएलमध्ये खेळण्यास आलेल्या नवनवीन क्रिकेटपटूंची माहिती तोंडपाठ असल्यासारखे घडाघडा बोलून दाखवतील. पण महिला क्रिकेटपटूंच्या बाबतीत माहिती विचारल्यास लगेचच ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ अशातला प्रकार दिसून येईल. फार फार तर डायना एडल्जी, मिताली राज, झुएला गोस्वामी ही दोन-चार नावेच सांगता येतील. का ही तीन-चारच नावे भारतीय महिला क्रिकेटमध्ये होती का? अन्य महिला खेळाडूंनी योगदान दिले नाही का? मग त्यांच्यावर अन्याय करण्याचा आपणास कोणी दिला आहे?
आशिया चषक जिंकल्यामुळे भारतीय महिला क्रिकेट खेळाडूंवर पुन्हा एकवार प्रकाशझोत पडला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय महिला क्रिकेटर्सची कामगिरी उंचावत चालली आहे. एकेकाळी कोहली, रोहित शर्मा, धोनीवर जीव ओवाळून टाकणारी भारताची युवा पिढी आता गुगलवर स्मृती मानधनासह अन्य महिला खेळांडूची माहिती ‘सर्च’ करू लागली आहे. ही महिला क्रिकेटसाठी चांगल्या भविष्याची नांदी मानावयास हरकत नाही. मानधनातही दोन्ही क्रिकेटपटूंमध्ये तफावत पाहावयास मिळत आहे. जगाच्या क्रिकेट विश्वामध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला कुबेर असे म्हटले जाते. अन्य देशांच्या क्रिकेट मंडळांच्या तुलनेत बीसीसीआय श्रीमंत आहे. आयपीएलसारख्या खेळाच्या आयोजनामध्ये बीसीसीआयची श्रीमंती पावलापावलावर पाहावयास मिळते. मग क्रिकेटच्या बाबतीत महिला व पुरुष असा दुजाभाव का? आता महिला क्रिकेट खेळांडूची दिवसेंगणिक होत असलेली गरुडभरारी पाहता जाहिरातदारांनी आपल्या प्रॉडक्टच्या जाहिरातीसाठी महिला क्रिकेट खेळाडूंचा प्राधान्याने विचार करावयास हवा. खेळाच्या मैदानावर चमकणाऱ्या भारतीय महिला खेळाडू दिसण्यातही कोणा अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. त्यांना जर जाहिरातीत स्थान मिळाले, तर प्रसिद्धीचा झोत त्यांच्याकडे राहील, जनसामान्यांमध्ये प्रकर्षाने ओळख वाढेल, महिला क्रिकेटपटूंच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल आणि जाहिरातदारांच्या प्रॉडक्ट विक्रीलाही हातभार लागेल. जर आशिया चषक भारतीय क्रिकेटपटूंनी जिंकला असता, तर वृत्तवाहिन्यांनी सातत्याने हाच विषय चघळला असता, वर्तमानपत्रांत रकानेच्या रकाने भरून आले असते.
पण हे भाग्य आजही क्रिकेट खेळणाऱ्या तसेच क्रिकेट खेळामध्ये भारताचा नावलौकिक आपल्या कामगिरीने वाढविणाऱ्या महिलांच्या नशिबी नाही. आशिया चषकावर भारतीय महिला खेळाडूंनी प्रथमच नाव कोरले आहे, अशातला भाग नाही. यापूर्वीही भारतीय महिलांनी तब्बल सहा वेळा आशिया चषक जिंकला असून यंदा आशिया चषक जिंकताना भारतीय महिलांनी विजयाची सप्तपदीच पूर्ण केली आहे, असे अभिमानाने म्हणणे योग्य ठरेल.
टेनिसमधील सानिया मिर्झा, बॅडमिटनधील पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल यांसह विविध खेळांमध्ये चमकधमक दाखविणाऱ्या महिला खेळाडूंच्या बाबतीत पुरुष खेळाडूंच्या तुलनेत दुजाभावच झालेला आहे आणि आजही होतच आहे. टेनिसमध्ये लिएडर पेस, रमेश कृष्णन, रामनाथ कृष्णन, महेश भूपती यांना जी प्रसिद्धी मिळाली, ती आजही सानिया मिर्झाला मिळालेली नाही. आदिवासी समाजातील गोरगरीब घरातून आलेल्या लिंबारामला प्रसिद्धी मिळाली, पण सातत्याने कष्ट करून परिश्रमपूर्वक संघर्ष करत नावारूपाला आलेल्या अंजली वेदपाठकचे कोणाला स्मरणही होत नाही. बॅडमिटनमध्ये मात्र सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू त्या तुलनेत नक्कीच नशीबवान आहेत. बॅडमिटनपटू प्रकाश पदुकोणच्या तोडीस तोड किंबहुना त्याहून जास्त प्रसिद्धी सायना आणि सिंधूला मिळालेली आहे. आज देशामध्ये पी. व्ही. सिंधू (बॅडमिंटन), दुती चंद (अॅथलेटिक्स), सानिया मिर्झा (टेनिस), हरमनप्रीत कौर (क्रिकेट), विनेश फोगट (कुस्ती), सायना नेहवाल (बॅडमिंटन), हिमा दास (अॅथलेटिक्स), दीपा कर्माकर (जिम्नॅस्टिक), अदिती अशोक (गोल्फ), अन्नू राणी (भालाफेक) या भारतातील विविध खेळांमध्ये चमक दाखविणाऱ्या दहा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत. पण सिंधू, सायना वगळता यातील बऱ्याच जणींची नावेही कोणाला माहिती नसतील, तर कामगिरी काय माहिती असणार?