विरार (प्रतिनिधी) : वैतरणा नदीपात्रात होत असलेल्या बेकायदा रेतीउपशामुळे वैतरणा खाडीवरील रेल्वेच्या पुलाला उद्भवणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी या मार्गावरील रेती उत्खनन व नौकानयन मार्ग बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
रेल्वे ब्रिज क्रमांक ९३ च्या कार्यक्षेत्रात व त्यांच्या मार्गामधील रेती उत्खनन व नौकानयन मार्ग बंद करण्याची आवश्यकता पश्चिम रेल्वेचे मुख्य अभियंत्यांनी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी या ब्रिजचे महत्त्व व रेल्वे ब्रिजला संभाव्य धोका उद्भवल्यास होणारे परिणाम याबाबत कळविलेले आहे.
या पत्रातील गांभीर्य लक्षात घेऊन पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वे ब्रिज क्रमांक ९३च्या कार्यक्षेत्रातील रोडचा वापर रेती वाहतूक ट्रकसाठी प्रतिबंधित केला आहे. या आदेशान्वये वैतरणा नदीवरील ब्रिज व इतर ब्रिजच्या ६०० मीटर कार्यक्षेत्रात पोलीस गस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.