मुंबईतील अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतल्याचे जाहीर केले आणि त्यामुळे उद्धव सेनेच्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. खरे तर विधानसभेची ही पोटनिवडणूक आहे. पण महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. ही निवडणूक केवळ उद्धवसेना विरुद्ध भाजप अशी नाही, तर महाआघाडी विरुद्ध भाजप-शिंदे सेना असे त्याला स्वरूप प्राप्त झाले होते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीला फार मोठे राजकीय महत्त्व आले होते. या निवडणुकीचा निकाल म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीची झलक असेल, असे वर्णन केले गेले. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. उद्धव गटाने रमेश यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना पक्षाची उमेदवारी दिली. त्या दिवसापासूनच राजकीय वादविवादाला तोंड फुटले. लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्याची प्रथा अनेक राजकीय पक्षांनी अनेकदा पाळली आहे. नेमका हाच मुद्दा घेऊन उद्धव सेनेने मतदारांना भावनिक आवाहन केले. रमेश यांचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पत्नी ऋतुजा यांना निवडून द्या, असा प्रचारही सुरू झाला. त्यात आक्षेपार्ह असे काही नव्हते. पण दुसऱ्या पक्षाने पोटनिवडणूक लढवूच नव्हे, असे कायम कधी घडत नाही.
अंधेरीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेऊन भाजपने मनाचा मोठेपणा दाखवला; किंबहुना महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत पराभव होणार, असे वातावरण असते, तर भाजपनेही आपला उमेदवार मैदानात कशाला उतरवला असता? भाजपने ज्यांना उमेदवारी दिली, ते मुरजी पटेलही साधी व्यक्ती नाहीत. त्यांचा जनसंपर्क मोठा आहे, त्यांचे सार्वजनिक काम मोठे आहे. गेल्या निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार होते, तेव्हा भाजप-शिवसेना युती होती, रमेश लटके हे ६२ हजार मते घेऊन विजयी झाले होते तरी मुरजी पटेल यांनी ४५ हजार मते खेचली होती, हे कसे विसरून चालेल. आता ते भाजपचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची त्यांना भक्कम साथ होती, शिवाय गेल्या तीन वर्षांत त्यांनी मतदारसंघात जोमाने काम केले होते, त्यामुळेच ते भरघोस मतांनी विजयी होणार, असा अंदाज प्रकट केला जात होता. दिवंगत लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात त्याच्या पत्नीला बिनविरोध निवडून द्यायला हवे, असा प्रचार उद्धव सेनेने चालवला. तो एक भावनिक राजकारणाचा भाग होता. पण दसरा मेळाव्याला उद्धव सेनेला शिवाजी पार्क मैदान मिळू नये म्हणून शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासनावर दबाव आणला, इथपासून ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करू नये म्हणून या सरकारने महापालिकेवर दबाव आणला, इथपर्यंत आरोप केले गेले. या सर्व प्रकरणात शिंदे-फडणवीस सरकारच्या बदनामीचा भरपूर प्रयत्न झाला. तरीही या नेत्यांनी संयम बाळगला. या सर्व घटनांमध्ये मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाला कमीपणा येईल, असे कोणतेही भाष्य केले नाही. न्यायालयाने जो काही निकाल दिला, तो खुल्या मनाने मान्य केला. तरीही उद्धव गट आणि महाघाडीतील नेत्यांनी शिंदे-फडणवीसांची कशी जिरली, असे टुमणे चालूच ठेवले.
मुरजी पटेल यांनी यावेळी ही निवडणूक जिंकायचीच, असे मनोमन ठरवून जिद्दीने लढत देण्याचा आराखडा तयार केला होता. त्यांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हाच हजारो कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पण अचानक त्यांना माघार घेण्यास सांगण्यात आले, तेव्हा त्या उत्साहावर विरजण पडले. आम्हाला कोणी विश्वासात घेतले नाही, असे कार्यकर्ते सांगत होते. अनेक त्यांच्या पाठीराख्यांनी संताप व्यक्त केला. पण मुरजी पटेल यांनीही संयम बाळगून पक्षाने दिलेला आदेश आपणास मान्य आहे, हे जाहीरपणे सांगितले. शरद पवार, राज ठाकरे आणि अन्य काही नेत्यांनी अंधेरीची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन केले होते. राज ठाकरे यांनी तर देवेंद्र फडणवीस यांनाच थेट पत्र लिहून महाराष्ट्राची चांगली परंपरा भाजपने जपावी व माघार घ्यावी, असा सल्ला दिला होता. भाजपनेही या सूचनांचा गांभीर्याने विचार केला व अंधेरीच्या पोटनिवडणुकीतून आपला पक्ष माघार घेत असल्याचे जाहीर केले. एवढेच नव्हे, तर मुरजी पटेल हे अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवणार नाहीत, असे पक्षाने जाहीर केले. राज्यात ठाकरे सरकार सत्तेवर असताना पोलीस-प्रशासनाचा कसा गैरवापर सर्रास केला गेला, हे सर्व जनतेने बघितले आहे. देवेंद्र फडणवीस व नारायण राणे यांच्याविरोधात त्या सरकारने यंत्रणा वापरल्या, हे सर्वश्रुत आहे. मग तेव्हा, आज राजकीय संस्कृतीविषयी बोलणारे महाआघाडीतील नेते कुठे लपून बसले होते? ‘‘यांना तातडीने उचला, आपले वरती बोलणे झाले आहे’’, असे त्या सरकारमधील एक मंत्री सांगत असतानाच टीव्हीच्या पडद्यावर कोट्यवधी लोकांनी बघितले होते, तेव्हा राजकीय संस्कृती व परंपरा यांचे भान सुटले, असे महाआघाडीतील कोणाला किंचितही वाटले नव्हते.
अंधेरीच्या पोटनिवडणुकीतील जय-पराजयाने फार काही राजकीय स्थित्यंतर घडणार नाही, उद्धव सेनेकडे जागा कायम राहिली म्हणून शिंदे-फडणवीस सरकारला मुळीच फरक पडणार नाही. तरीही ही निवडणूक लढवताना उद्धव सेनेला भावनिक आधार का लागतो आहे? ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळातील काम चांगले असेल, तर लोकांनी मतदान केले असते, पण त्याची खात्री नसल्यामुळेच रमेश लटके यांच्या विधवा पत्नीला बिनविरोध निवडून द्या, असे सांगण्याची पाळी उद्धव सेनेवर आली आहे. भाजपचा माघारीचा निर्णय राजकीय सुज्ञपणाचा आहे. मशाल विरुद्ध कमळ यांच्या राजकीय संघर्षात मधेच उत्तर भारतीय सेनेच्या क्लिप्स झळकू लागल्या. अंधेरीत मराठी भाषिकांपेक्षा उत्तर भारतीयांची संख्या जास्त असल्याने भाजपने उत्तर भारतीय उमेदवार दिला पाहिजे यासाठी थेट अमित शहांपर्यंत या संघटनेने मागणी केली. जात-पात आणि प्रदेशाचा वापर करून पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. पण या निवडणुकीतून आता भाजपने माघार घेतल्यामुळे अशा संकुचित वृत्तीच्या संघटनांना आपोआपच लगाम बसला आहे.