जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव ते मनमाड या १६० किमी लांबीच्या चौथ्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून या बाबतचे पत्र भुसावळ विभागाला प्राप्त झाले आहे. या मंजुरीमुळे सर्वेक्षणाची निविदा लवकरच काढण्यात येईल.
मध्य रेल्वेच्या जळगाव ते मनमाड अप आणि डाऊन रेल्वे मार्गावर दर दहा मिनिटांनी गाडया धावत असतात. अत्यंत व्यस्त असलेल्या या मार्गावर एखादा अपघात झाल्यास त्याचा वाहतुकीवर परिणाम होउुन वाहतूक ही विस्कळीत होते. यावर उपाय म्हणून तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या उभारणीचा प्रस्ताव भुसावळ विभागाने रेल्वे मंत्रायलाकडे पाठवला होता.
दरम्यान, जळगाव ते मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळून काम देखील सुरू झाले असून पाचोरा पर्यंत काम पूर्ण होत आले आहे. तसेच मनमाड कडून १७ किमी लांबीचा मार्ग टाकला गेल्याचे सांगण्यात येते. आता चौथ्या मार्गाच्या सर्वेक्षणाला परवानगी मिळाली आहे. या सर्वेक्षणासाठी दोन कोटींचा निधी देखील मंजूर केला गेला आहे. चारही मार्ग झाल्यानंतर जळगाव मनमाड दरम्यान विलंबाने गाडया धावण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच मेगाब्लॉकमुळे रुदृ होणाऱ्या गाड्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.