मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या २८७ शाळांना टाळे लागण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील साडेचार हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असून, अतिदुर्गम आदिवासी व ग्रामीण भागातील या शाळा बंद झाल्यास आमच्या लेकरांनी शिकायचे कुठे, असा प्रश्न पालकांना पडला आहे.
महापालिका हद्दीतील शाळा जिल्हा परिषदेमार्फत चालविल्या जातात. आपल्या हद्दीतील शाळा बंद होत असताना ठाणे जिल्हा परिषद प्रशासन व पदाधिकारी मात्र मूग गिळून आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांतील ३५ हून अधिक प्राथमिक शाळा, अंबरनाथ व बदलापूरला नगरपालिका हद्दीत ६० हून अधिक प्राथमिक शाळा, मुरबाड व शहापूर नगरपंचायत हद्दीतील १० प्राथमिक शाळा, नवी मुंबई महापालिका हद्दीतील १३ प्राथमिक शाळा जिल्हा परिषद चालवत आहे. आणि तेथील स्थानिक स्वराज्य संस्था मात्र बघ्याची भूमिका घेत आपली जबाबदारी टाळत आहेत.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कल्याण, मुरबाड, शहापूर व भिवंडी, अंबरनाथ या पाच तालुक्यांतील वीस विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील साडेचार हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. शिक्षण अधिनियम २००९ नुसार प्रत्येक बालक शाळेत शिकेल व टिकेल याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. किमान एक किमी अंतरावर वाड्या पाड्यात प्राथमिक शाळा सक्तीची असताना आता कमी विद्यार्थी म्हणून या शाळांना टाळे लागले तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिकायचे की अशिक्षितच राहायचे, असा संतप्त सवाल पालकवर्गाकडून उपस्थित होत आहे.
मुरबाड तालुक्यात पटसंख्या कमी असलेल्या सर्वधिक १०५ शाळा आहेत. विशेष म्हणजे तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष पवार हे ठाणे जिल्हा परिषदेचे पाच वर्षे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षण समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याच तालुक्यातील शाळांना आता टाळे लागण्याची शक्यता आहे.
राज्यात २०१७ मध्ये भाजप-शिवसेनेची सत्ता असताना २० पटसंख्या असणाऱ्या शाळा सरकारने बंद केल्या. त्यामुळे शेकडो प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे हाल झाले. सरकारने शाळा बंद केल्या; मात्र पर्यायी शाळेची व्यवस्था केल्याने विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी वाहतूक भत्ता दिला नाही. – विलास रोहने, पालक, वाहोलीपाडा, कल्याण तालुका
पटसंख्येच्या सर्वेक्षणात २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या २८७ शाळांची माहिती प्राप्त झाली आहे; मात्र या शाळा बंद करण्याबाबत निर्णय झालेला नाही. – भाऊसाहेब कारेकर,जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी
तालुका : शाळा
मुरबाड – १०५
शहापूर – १००
भिवंडी – ४६
अंबरनाथ – १९
कल्याण – १७