Monday, April 28, 2025
Homeसाप्ताहिककोलाजयाला जीवन ऐसे नाव

याला जीवन ऐसे नाव

डॉ. विजया वाड

“आदिल, तू इथे कसा?” आदिल माझा उदयाचल हायस्कूलचा विद्यार्थी. माझी पहिली शाळा. जिथे मी शैक्षणिक कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. या आधी किरकोळ नोकऱ्या केल्या होत्या. पण मग मुली झाल्या नि फरक पडला. आयुष्य बदलले. एका पाठोपाठ एक दोनच मुलींची आई! प्राजक्ता, निशिगंधा. माझी सूर्यफुले. शतदळांनी माझ्या आयुष्यात आनंद फुलविणाऱ्या घरात काही वाद झाला, तर सदैव आईची ढाल बनून उभ्या राहणाऱ्या माझ्या प्रवक्त्या. आजी सारे करी. जेवण, खाणं, दूध, पाणी, विधी, सारं सारं. पण पाच वाजले की पायरीवर! दोघी! “आमच्या आईची वाट बघतो.” हे भरत वाक्य. “दिवसभर कोण करतं? तुमची अाई?” दुर्लक्ष. आई सगळ्या जगात प्यारी. हे माझं भाग्य! अहोभाग्य!! नाही तर दुसरं काय? नियमित उत्पन्न घरात यावे, म्हणून मी उदयाचलात नोकरी सुरू केली आणि तिथला माझा लाडका विद्यार्थी आदिल.
मी हायवेवर होते. गाडी चालवीत येत होते. मध्ये थांबवली. आदिल वाटेवर भेटला. त्याला पटकन् गाडीत घेतले.
“उशीर झाला रे?”
“हं” त्याला धाप लागलेली.
“रिक्षा करायची ना?”
“पैसे नव्हते. म्हणजे होते पण संपलेले. कन्नमवार नगरमध्ये रिक्षा नेली. तिला इस्पितळात सोडली.”
“कोण ती?”
“होती एक. नववीत होती. पुष्पा
कात्रक नाव.”
“मग?”
“हायवेवर क्रॉस करताना स्कूटरनं
धडक दिली.”
“मग रे?”
“स्कूटरवाला पळून गेला हो. घाबरला असेल. पुष्पा रस्त्यात पडलेली. मला
पाहवले नाही.”
“वा!”
“तिला रिक्षाने कन्नमवार नगर येथील सरकारी इस्पितळात सोडले. तिच्या नातेवाइकांना फोन करून बोलावले. मग त्यांच्यापैकी एक येताच इस्पितळ सोडलं नि निघालो. परिणामी वीस मिनिटं उशीर झाला.”
“चांगलं काम केलंस.”
“परीक्षा होती. युनिट टेस्ट.”
“उशीर झालाय आदिल. पण मी एचएमना सांगीन. तुला नक्की ते पेपर लिहायला.”
“तुम्ही सांगितल्यावर देतीलच.”
फुशारले मी. मुख्याध्यापकांची आवडती, विश्वासू शिक्षिका!
“चल, गाडीत बस पटकन्. आज टीचर सोबत लिफ्ट.”
“धन्यवाद टीचर.” तो लाजला. पण
बसला गाडीत.
“काय रे आदिल?”
“बोला ना टीचर.”
“रस्ता क्रॉस करताना. तो स्कूटरवाला धडकला. त्याने स्कूटर थांबवली नाही?”
“घाबरला हो तो. डरपोक होता.”
“असो. तू वेळेवर देवासारखा
उभा राहिला.”
“देवाचा दूत बनून. गॉड सेंट मी अॅज हिज एंजल.”
“खरोखर देवदूत आहेस तू!”
“धन्यवाद टीचर.”
“आदिल, पण परीक्षा होती ना रे?”
“एखाद्याच्या जीवनापेक्षा परीक्षा का जास्त आहे टीचर?”
माझ्या डोळ्यांत पाणी जमले. मुलांना सार्थ जीवनशिक्षण दिले याचा अभिमान मनी
दाटून आला.
‘जीवन शिक्षण’ कम्युनिटी लिव्हिंगचा तास उदयाचलात असे. तसा तो प्रत्येकच शाळेत होत असे. पण कम्युनिटी लिव्हिंगचा तास म्हणजे आराम! दंगा! मज्जा! असा सार्वत्रिक गैरसमज होता. एकता, एकोपा, उपयुक्त कामे शिकणे, एकत्र दिलजमाईने जगणे, संगीताचा, एकत्र कामे करण्याचा, सामुदायिक जीवनाचा अनुभव घेणे यातलं काहीच नाही? बिनगॅसच्या पाककृती शिका, एकत्र गाण्याच्या भेंड्या खेळा, एकमेकांबद्दल चांगली पाच वाक्ये लिहा. पाचच का? अहो, दुसऱ्याबद्दल चांगला विचारसुद्धा करीत नाहीत लोक. म्हणून पाच वाक्य लिहिली. टीका करायला नाक वर! तोंड पटापटा उचकटेल. पण ‘चांगलं’ बोलणं? ना बा नाना!
आमच्यात दर बुधवारी जेवणाच्या सुट्टी आधीचा पीरियड जीवन शिक्षणाचा असे. तो पीरियड झाला रे झाला की जेवणाची सुट्टी. काही शिक्षक त्या तासाला मुलांना जेऊ देत. मग सुट्टीत खेळच खेळ! आहे की नाही मज्जा! ज ला मज्ज्ज्जा! कितीही ‘ज’ लावा. कमीच पडतील.
“तू खऱ्या अर्थाने जीवनशिक्षण घेतले आहेस आदिल. मी एचएम् सरांना नक्की सांगेन.”
“धन्यवाद टीचर.”
आदिल आणि मी शाळेत पोहोचलो.
“एचएम् साहेब, आदिलला माफ करा.”
“तुम्ही सांगता, तर करतो माफ. द रिझन मस्ट बी गुड.”
“एक शिक्षिका तुम्हास सांगते आहे.” मी घडला प्रसंग कथन केला. एचएम् म्हणाले, “झाले ते छानच. मी पेपर देतो तुला. पण काय रे? ही बोर्डांची परीक्षा असती तर?”
“तरीही मी हेच केले असते. जीवनापेक्षा परीक्षा का मोठी?
‘जीवन अनमोल आहे’ असं तुम्हीच शिकविलं आहे ना सर?”
आदिल ‘मोठा’ माणूस होता. ‘मोठेपण’ वयावर अवलंबून नसतं हेच खरं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -