Wednesday, July 24, 2024
Homeसाप्ताहिककोलाजआदेश न्यायालयाचा, जीव गेला तरुणीचा

आदेश न्यायालयाचा, जीव गेला तरुणीचा

अॅड. रिया करंजकर

समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. काहींच्या आयुष्यात कमी अधिक प्रमाणात या समस्या आढळून येतात. पृथ्वीतलावरील एकही असा मनुष्य नाही की, त्याच्या आयुष्यामध्ये समस्या नाहीत. या समस्येमुळे माणसांचे आयुष्य सैरभर झालेले दिसून येते. या समस्यांमुळेच अनेक लोकांनी आपल्या आयुष्यही संपवलेले दिसते, पण माणसांचा पाठलाग समस्या कधी सोडत नाहीत. समस्या नाही असं कोणाचं आयुष्य आढळून येणार नाही. सर्वात जास्त समस्या या स्त्री जातीच्या वाट्याला आलेल्या असतात आणि या समस्येमधून जगण्याचा प्रयत्न स्त्री करत असते, पण कधी कधी हे प्रयत्नही कमी पडतात.

निकिता ही सर्वसामान्य मुलीसारखीच उच्चशिक्षित अशी मुलगी. योग्य वय झाल्यावर तिच्या आई-वडिलांनी तिला शोभेल अशा संदेशाबरोबर रितीरिवाजानुसार विवाह करून दिला. सुरुवातीचे वर्ष नवदाम्पत्याला जशी आनंदाची, उत्साहाची असतात, तसंच या दोघांच्या बाबतीत झालं. नंतर हळूहळू निकिताला संदेशच्या घरातल्या लोकांचे स्वभाव आणि त्यांचे वागणं समजू लागलं. एवढंच नाही तर आपला पती संदेश हा बोलतोय एक आणि करतो एक, असा त्याचा स्वभाव आहे, हे समजून चुकलं. सासू-सासरे तिला प्रत्येक गोष्टीवर कारण नसतानाही ओरडत होते. प्रत्येक गोष्टीत तिची चूक काढत होते. ती बिचारी आपल्या आई-वडिलांसाठी सगळ्या गोष्टी निमूटपणे सहन करत होती. कधीतरी ही परिस्थिती सुधारेल, अशी आशा तिची आई तिला दाखवत होती आणि प्रत्येक स्त्रीच्या वाट्याला अशीच परिस्थिती येते, ही तिची आई तिला सांगत होती. मीही या गोष्टीतून गेलेली आहे. स्त्री जातीला या गोष्टी चुकत नाहीत. त्यातून आपण पुढे जायचं असतं. असं निकिताची आई निकिताला समजवत असे. हळूहळू संदेश तिला छोट्या छोट्या कारणांवरून मारझोड करू लागला. एवढंच नाही तर सासू-सासरे तिच्यावर हात उगारू लागले. हे मात्र तिला सहन होईना. घरातील सर्व करूनही आपल्यालाच बोलणी खावी लागतात, कारण नसतानाही मार खावा लागतो. ज्यावेळी या गोष्टींचा अतिरेक झाला. तिच्या सहनशीलतेच्या पलीकडे सर्व गेलं, त्या वेळी आपल्या आई-वडिलांचं घर गाठलं. अक्षरश: आपला आई-वडिलांच्या पाया पडून मला चार दिवस जगू दे. मला इथेच राहू दे, अशी तिने काकूला विनंती केली. त्यावेळी तिच्या आई-वडिलांना जाणवलं की, आपण समजतो तेवढी परिस्थिती साधी-सुधी राहिलेली नाही. त्यानंतर दोन्ही पक्षकारांमध्ये अनेक मीटिंग झाल्या पण विषय काही सुटेना. ते शेवटी निकिताने डोमेस्टिक वायलांच्या अंतर्गत संदेश आणि संदेशच्या आई-वडिलांविरुद्ध कोर्टामध्ये केस फाईल केली आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध केस फाईल झाल्यानंतर संदेश व त्याचे कुटुंब काही कोर्टात हजर राहिले नाहीत. वकील आणि आपल्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून संदेशच्या कुटुंबांना कोर्टात आणलं. टीव्ही मॅटर असल्यामुळे त्यांच्यामध्ये न्यायालयामध्ये कौन्सिलिंग झालं. न्यायालयाने कोर्टात केस फाईल आहे, पण संदेश आणि आई-वडिलांनी सांगत याच्यापुढे कोणती चुकीची गोष्ट करणार नाही, त्यामुळे निकिताने थोडे दिवस आपल्या सासरी जाऊन नांदावे. काय परिस्थिती आहे ती बघावी, असा कौन्सिलिंगमध्ये निर्णय घेण्यात आला.

कोणत्याही न्यायालयाला कुटुंब विभक्त व्हावं असं वाटत नाही. त्यामुळे न्यायालयाने निकिता आणि संदेश पुन्हा एकत्र यावे, यासाठी काही दिवस एकत्र राहावं, असं न्यायालयाने सुचवलं. पण निकिताला आपला पती संदेश व त्याच्या आई-वडिलांचा स्वभाव व त्यांची वागणूक माहीत होती. तिने ते झेललेलं होतं. त्याच्यामुळे निकिता सासरी जाण्यास तयार नव्हती. तिच्या मनामध्ये खूप मोठी भीती निर्माण झाली होती. मी सासरी गेले तर माझं काय होईल, पण निकिताच्या वकिलाने तिला समजावलं की, या मॅटरमध्ये अशाच प्रकारे स्टेप असतात, त्या पार कराव्या लागतात. मग पुढची प्रोसिजर मार्गी लागते.

निकिताच्या वकिलाने तिला व्यवस्थित समजावलं. आपल्या वकिलावर विश्वास ठेवून आणि पुढे मला योग्य न्याय मिळेल, या खात्रीमुळे ती सासरी जायला तयार झाली. पण पुढे काय वाढून ठेवलेले आहे तिच्या नशिबात हे मात्र कोणालाच माहीत नव्हतं. निकिता आपल्या मनाविरुद्ध पण न्यायालयाचा आदेश आहे म्हणून संदेशबरोबर संदेशच्या घरी नांदायला गेली. पण, तिच्या मनामध्ये फार मोठी भीती होती. लग्न झाल्यानंतर जो आनंद तिच्या चेहऱ्यावर होता. नांदायला जाण्याचा तो आता कुठेही जाणवत नव्हता. निकिताच्या आई-वडिलांनाही वाटलं आता कुठेतरी आपल्या मुलीचे व्यवस्थित होईल आणि सर्व काही मार्गी लागेल, अशी आशा त्यांना वाटली.

दोन दिवस निकिताचा आई-वडिलांना अजिबात फोनही आला नाही. आपली मुलगी संसारात रममाण होत आहे, असेही त्यांना वाटलं. पण लगेचच एका आठवड्यामध्ये निकिताचा मृत्यू झाल्याची खबर तिच्या आई-वडिलांना पोहोचली. सकाळी सकाळी निकिताच्या आई-वडिलांनी वकिलांना फोन करून निकिताबद्दल झालेली घटना सांगितली. आमच्या मुलीचा जळून मृत्यू झाला आहे व कायमची गेली हो. पोलीस केस वगैरे झाली. निकिताचे सासू-सासरे व तिच्या नवऱ्याने तिला जाळून मारले होते. कारण निकिताने त्यांच्याविरुद्ध कोर्टात केस केली, हा राग त्यांच्या मनात खतखदत होता. निकितामुळे त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागली होती. समाजामध्ये बदनामी सहन करावी लागली होती. त्याचा राग त्यांच्या मनात होता म्हणून तिला घरी नांदवायला आणायचं आणि संपवायचं हा अगोदरच प्लॅन त्यांनी आखलेला होता आणि त्याचप्रमाणे त्यांनी तो अमलात आणलेला होता. न्यायालयाच्या आदेशाचा मान राखून निकिता सासरी नांदायला गेली ती कायमची निघून गेली. निकिताला मारल्याचा पश्चाताप तिच्या पतीवर व सासू-सासऱ्याना नव्हता. उलट आम्हाला शिक्षा द्या, आम्ही ती भोगायला तयार आहोत, असे ते लोक म्हणत होते. आम्ही जे केलं ते योग्यच केलं. मुलींच्या जातीशी असंच वागलं पाहिजे, असं ठाम मत या लोकांचं होतं. पण केलेल्या कृत्यावर त्यांच्या मनामध्ये जराही पश्चातापाचा लवलेश नव्हता.

(सत्य घटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -