Saturday, July 13, 2024
Homeमनोरंजनरही मन में मीलन की वो बात आधी...!

रही मन में मीलन की वो बात आधी…!

श्रीनिवास बेलसरे

शांतारामबापूंच्या १९५९ला आलेल्या ‘नवरंग’मध्ये महिपाल, जितेंद्र आणि आगा सोडले तर बहुतेक कलाकार मराठी होते. त्यात संध्या, केशवराव दाते, चंद्रकांत मांढरे, बाबुराव पेंढारकर, वत्सला देशमुख, वंदना सावंत यांचा समावेश होता. तसा महिपाल सिंगचा पहिला चित्रपट होता १९४२ साली आलेला ‘नजराना’ त्यानंतर महिपालने व्ही. शांताराम यांच्यासाठी ४ सिनेमांची गाणीही लिहिली होती. नंतर त्याने सोहराब मोदी, होमी वाडिया, जे. बी. एच. वाडिया यांच्याबरोबरही काम केले. ‘नजराना’(१९४२)पासून ‘अमरज्योती’(१९८४)पर्यंत त्याची तब्बल ४२ वर्षं कारकीर्द होती पण त्याला नाव मिळवून दिले ते बापूंच्या पौराणिक सिनेमातील भूमिकांमुळेच. ‘नवरंग’ची कथा ग. दि. माडगुळकरांची होती, तर पटकथा बापूंनीच लिहिली.

दिवाकर नावाचा कवी इंग्रजी राजवटीच्या काळात एका भारतीय राजाच्या पदरी राजकवी असतो. नेकीने आपली नोकरी करणे, पत्नी ‘जमुना’वर मनापासून प्रेम करणे आणि भावोत्कट कविता लिहिणे एवढेच दिवाकरचे जीवन असते. मात्र इंग्रज सरकारचे पाहुणे राजाकडे मैत्रीचा हात घेऊन आले असताना दिवाकर इंग्रजांवर टीका करणारे एक गाणे म्हणतो. त्यामुळे त्याची नोकरी जाते.

त्याचा स्वभाव अतिशय मनस्वी असल्यामुळे त्याच्या मनात काव्यप्रेरणेची एक प्रतिमा तयार होते. हुबेहूब जमुनासारख्या दिसणाऱ्या या काल्पनिक प्रियेचे नाव तो मोहिनी असे सांगतो. वास्तवात हे जरी त्याला होणारे भास, म्हणजे चक्क hallucination असले तरी त्याला ते खरेच वाटतात. त्यातून जमुना आणि त्याच्यात वाद होतात. ते इतके विकोपाला जातात की ती घर सोडून जाते. तशात दिवाकरच्या वडिलांच्या मृत्यू होतो. नोकरी, पत्नी आणि वडील गमावलेल्या अवस्थेत उदास मन:स्थतीत बसलेल्या नवरंगला पाहून राजनर्तिकेला दया येते आणि ती पती-पत्नीचे पुनर्मिलन घडवून आणते अशी एकंदर कथा. त्यावेळी दरबारात नवरंग एक विलापगीत गातो. ते मन्ना डे आणि आशाताईंच्या आवाजातले “तू छुपी हैं कहां, मैं तडपता यहां” हे गाणे सी. रामचंद्र यांच्या संगीत दिग्दर्शनाचा, आशाताई आणि मन्नाडेंच्या गायकीचा एक मास्टरपीस होता.

पडद्यावर जरी संध्या आणि महिपाल दिसत असले तरी शांतारामबापूंनी एक अद्भुत कल्पना अमलात आणली होती. मनस्वी कवी आणि त्याची प्रतिभा यांच्यातील अतूट नाते त्यांना दृश्य स्वरूपात दाखवायचे होते. ‘मोहिनी’ ही नवरंगची प्रतिभा होती आणि तीच रुसल्यावर कवीची झालेली घालमेल म्हणजे हे गाणे होते. म्हणून तो म्हणतो, ‘तेरे बिन फिका फिका हैं दिलका जहां.’

असेच दुसरे अत्यंत गाजलेले गाणे म्हणजे –

आधा है चंद्रमा रात आधी,
रह ना जाये तेरी मेरी बात आधी.

या गाण्याने चित्रपटसृष्टीला एक महान गायक दिला! दमदार पहाडी आवाजाकरिता ओळखले जाणारे महेंद्र कपूर यांचे हे पहिले गाणे! त्यात आशाताईंचेही मोठे योगदान होतेच. भरत व्यास यांनी गाण्यात एक चिरंतन प्रेमकथा खुबीने गुंफली होती. जसे राधा-कृष्णाचे प्रेम ही एक अधुरी प्रेमकहाणी म्हणून साहित्यात रेखली गेली आहे तसेच नवरंग आणि मोहिनेचे प्रेम कधीच पूर्ण होऊ शकत नसते. कारण मोहिनी नावाची कुणी व्यक्ती नसतेच. त्यामुळे कवीच्या अंतर्मनाला लागलेली कायमची अधुरेपणाची हुरहूर म्हणजे हे गाणे आहे.

बहुतेक प्रेम कहाण्यात हेच घडत नसते का? बहुतांश वेळा प्रेमाचा संदेश पोहोचतच नाही, माणूस भेटले तरी आणि नाही भेटले तरी! प्रेमाच्या पूर्ण संवादाची, जीवलगासमोर मन रिते करून टाकायची अभिलाषा कुणी धरूच नये. ती धरली तर अश्रूच नशिबी येतात, पापण्या ओल्या राहतात आणि भावभावनांची बरसात अनेकदा आतल्याआतच सुकवावी लागते –

पिया आधी है प्यारकी भाषा,
आधी रहने दो मनकी अभिलाषा.
आधे छलके नयन, आधे ढलके नयन,
आधी पलकोंमें भी है बरसात आधी.
आधा है चंद्रमा रात आधी…

मीलनाची, जीवलगाशी एक होऊन जाण्याची, उत्कट इच्छा असते. ही इच्छा कधी पुरी होणारच नाही का? असा प्रश्न प्रेमिकांना पडतो. टी. एस. गणेशन आणि अशोककुमार यांच्या ‘कल्पना’ या १९६० साली आलेल्या चित्रपटात कमर जलालाबादी यांचे जबरदस्त द्वंद्वगीत होते. ‘तू हैं मेरा प्रेमदेवता, इन चरणोकी दासी हूं मैं.’ रफीसाहेब आणि मन्ना डेसाहेबांनी गायलेल्या या गाण्यात एक अतिसुंदर ओळ होती. ‘मनकी प्यास बुझाने आई, अंतरघट तक प्यासी हूं मैं.’ मनाच्या एकातएक बसलेल्या घटातील सर्वात आतल्या घटापर्यंत पोहोचलेली तीच तहान इथे भरत व्यासजींना सांगायची आहे. तिने दिवाकरच्या भावविश्वाला इतके व्यापले आहे की, त्याला आकाशसुद्धा स्वत:सारखे तहानलेले वाटते. तारकांच्या रोषणाईतही अपुरेपण दिसते.

आस कबतक रहेगी अधुरी?
प्यास होगी नहीं क्या ये पुरी?
प्यासा प्यासा पवन, प्यासा प्यासा गगन,
प्यासे तारोंकी भी है बारात आधी.
आधा है चंद्रमा रात आधी

त्याची प्रिया मात्र आडपडद्याने तक्रार करताना कृष्णकन्हैयाचा उल्लेख करून म्हणते, त्या मनमोहनानेही सूर अर्धाच लावला होता म्हणून तर राधेची प्रेमकथा अधुरीच राहून गेली. तिचे डोळे अर्धोन्मिलीत राहिले. ओठ अर्धे हलले आणि प्रेमाची अभिव्यक्ती होऊच शकली नाही. मीलनाची इच्छाही अपुरीच राहून गेली.

सुर आधाही श्यामने साधा,
रहा राधाका प्यार भी आधा,
नैन आधे खिले, होंठ आधे हिले,
रही मनमें मीलनकी वो बात आधी
आधा है चंद्रमा रात आधी…

प्रेमाची नेहमीच अतृप्त राहणारी तृष्णा अशी लीलया दोन बोटांत पकडणारी आपली जुनी गाणी म्हणजे अवघ्या भारतीयांचा केवढा मौल्यवान ठेवा आहे! तो खजिना निदान ती गाणी ऐकून तरी कधी कधी उघडून पाहायला नको का?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -