Saturday, April 26, 2025
Homeताज्या घडामोडीफेसबुक पोस्ट करून मनवा नाईकने शेअर केला उबरमधील धक्कादायक प्रसंग

फेसबुक पोस्ट करून मनवा नाईकने शेअर केला उबरमधील धक्कादायक प्रसंग

मु्ंबई : मराठमोळी अभिनेत्री मनवा नाईकला नुकताच एका धक्कादायक प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. मनवाने तिच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत तिने तिच्याबरोबर घडलेल्या धक्कादायक प्रसंगावर भाष्य केले आहे. पोस्ट शेअर करत तिने एका गाडीचा नंबर आणि त्या वाहन चालकाचा फोटोदेखील शेअर केला आहे.

मनवाने लिहिले आहे, “माझ्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग तुमच्यासोबत शेअर करायलाच हवा. मी रात्री ८.१५ च्या आसपास एक उबर केली होती. वांद्रे-कुर्ला संकुलाच्या आसपास पोहोचल्यावर तो उबर चालक फोनवर बोलत होता. दरम्यान मी त्याला फोनवर न बोलण्याचा सल्ला दिला. अशातच त्याने एक सिग्नलदेखील तोडला. मी वारंवार सांगून देखील तो त्याची मनमानी करत होता”.

पुढे गेल्यावर पोलिसांनी अडवले. त्याचा फोटोदेखील क्लिक केला. त्यानंतर उबर चालकाने पोलिसांसोबत हुज्जत घालायला सुरुवात केली. गाडीला फोटो काढला आहे तर आता आम्हाला जाऊ द्या असे मी पोलिसांना सांगितले. त्यामुळे त्या चालकाला राग आला. तो मला म्हणाला,” तू ५०० रुपये भरणार आहेस का? त्याला मी म्हटले,”फोनवर तू बोलत होतास”. त्यानंतर त्याने थांब तुला दाखवतो अशा शब्दांत धमकी द्यायला सुरुवात केली.

उबर चालकाला मी गाडी पोलीस स्टेशनजवळ घ्यायला लावली. तर त्याने बीकेसीमधील जिओ गार्डन परिसरात गाडी थांबवली. दरम्यान मी त्याला पोलीस स्टेशनला चला सांगत होते. तर तो माझ्यासोबत वाद घालत होता. त्यानंतर मी उबर सेफ्टीला फोन केला. त्यादरम्यानदेखील तो वेगाने गाडी चालवत होता.

प्रियदर्शनी पार्कात पोहोचलेलो असताना मी जोरजोरात हाका मारु लागले. ओरडायला लागले. त्यावेळी दोन दुचाकीस्वार आणि एका रिक्षाचालकाने मला त्या उबरमधून बाहेर काढण्यास मदत केली. त्यांनी त्या गाडीतून मला बाहेर काढले. मी सध्या सुरक्षित आहे. पण नक्कीच या सर्व प्रसंगामुळे मी खूप घाबरले आहे. सध्या मनवाची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -