डॉ. सुकृत खांडेकर
राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी मुलायम सिंह हे आखाड्यात कुस्ती खेळत असत. दि. २६ जून १९६० चा प्रसंग आहे. उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमधील करहल येथील जैन इंटर कॉलेजच्या प्रांगणात कवी संमेलन भरले होते. प्रसिद्ध कवी दामोदर स्वरूप विद्रोही कविता सादर करीत होते. त्यांच्या कवितेचे नाव होते, ‘दिल्ली की गद्दी सावधान!’ कविता सरकारच्या विरोधात होती. तेथे तैनात असलेला पोलीस अधिकारी त्वरित मंचावर धावत गेला. त्याने त्यांची कविता थांबविण्यासाठी त्या कवीसमोरचा माइक खेचून घेतला. आपण सरकारच्या विरोधात येथे कविता म्हणू शकत नाही, असे त्या कवीला पोलीस इन्स्पेक्टरने दरडावले.
कवी संमेलनात गोंधळ उडाला. श्रोत्यांमध्ये बसलेला २१ वर्षांचा तरुण पैलवान मंचावर धावत गेला व त्याने पोलीस इन्स्पेक्टरलाच ढकलून दिले. हा तरुण म्हणजे मुलायम सिंह यादव होता…. दि. ४ मार्च १९८४. रविवारचा दिवस. नेताजी मुलायम सिंह यांची इटावा आणि मैनपुरीत सभा होती. मैनपुरीतील सभेनंतर ते मित्राला भेटण्यासाठी गेले. त्याला भेटून बाहेर पडले आणि रस्त्यातच त्यांच्या मोटारीवर अचानक गोळीबार सुरू झाला. दोन हल्लेखोर त्यांच्या मोटारीचा पाठलाग करीत गोळीबार करीत होते. पण गाडीत नेताजी नेमके कुठे बसले आहेत, याची हल्लेखोरांना कल्पना नसावी. नेताजींनी त्यांच्या मोटारीतील इतरांना नेताजी मरण पावले, असा ओरडा करायला सांगितले. समर्थकांनी ‘नेताजी गेले, नेताजी मरण पावले’ असा ओरडा सुरू करताच, नेताजी मरण पावले, असे समजून हल्लेखोरांनी गोळीबार थांबवला. पण पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघे हल्लेखोर जबर जखमी झाले. नेताजी बचावले व पोलिसांनी त्यांना पाच कि.मी. अंतरावरील कुर्रा पोलीस ठाण्यावर नेऊन पोहोचवले.
१९८९ मध्ये मुलायम सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा ते लोकदलात होते. उत्तर प्रदेशमधील मुलायम सरकारला व केंद्रातील व्हीपी सिंग सरकारला तेव्हा भाजपने पाठिंबा दिला होता. पण व्हीपी सिंग यांनी ओबीसींना २७ टक्के नोकऱ्यांत आरक्षण देणाऱ्या मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्या आणि देशभर ‘मंडल विरुद्ध कमंडल’ असा संघर्ष सुरू झाला होता. त्याच वेळी अयोध्येतील बाबरी मशीद हटविण्यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने कारसेवा सुरू केली. लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली, त्यात हजारो कारसेवक सहभागी झाले. ३० ऑक्टोबर १९९० रोजी कारसेवकांची अयोध्येत प्रचंड गर्दी जमली. संतप्त व आक्रमक जमावाने पोलिसांनी उभे केलेले बॅरिकेट्सही तोडून टाकले. जमाव वेगाने बाबरी मशिदीकडे घुसू लागला, तेव्हा मुलायम सिंह यांनी कारसेवकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. त्यावेळी झालेल्या गोळीबारात अठ्ठावीस कारसेवकांचा मृत्यू झाला. दोनच दिवसांनंतर दि. २ नोव्हेंबर १९९० रोजी हजारो कारसेवक हनुमान गढीच्या जवळ पोहोचले. तेव्हा पुन्हा मुलायम सिंह यांनी पोलिसांना गोळीबार करण्याचा आदेश दिला. त्यात पन्नास कारसेवक ठार झाले. तेव्हा त्याची देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटली. मुलायम सिंह हे हिंदूविरोधी आहेत, अशी त्यांच्यावर जोरदार टीका झाली.
भाजप व अन्य संघटनांनी ‘मुल्ला मुलायम’ अशी त्यांची संभावना केली. गोळीबाराचा आदेश देणे हा खूप कठीण निर्णय होता, असे नंतर मुलायम सिंह यांनी म्हटले. पण त्या घटनेनंतर भाजपच्या विरोधातील धर्मनिरपेक्ष नेता म्हणून त्यांची प्रतिमा
तयार झाली. मुस्लिमांना तर मुलायम सिंह म्हणजे तारणहार वाटू लागले. नंतर लखनऊमधील एक सभेत बोलताना
मुलायम सिंह म्हणाले, ‘देश की एकता बचाने के लिए कुर्बानी देने के लिए मै तैयार हूँ।’ अयोध्येत मुलायम सिंह यांच्या सरकारने कारसेवकांवर केलेला गोळीबार आणि बिहारमध्ये लालू प्रसाद यादव सरकारने अडवाणी यांना केलेली अटक यामुळे भाजपचे १९९१च्या निवडणुकीत लोकसभेतील संख्याबळ लक्षणीय वाढले.
दि. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यावर मुलायम सिंह यांनी दलित-पिछडा हे समीकरण उत्तर प्रदेशमध्ये राबवायला सुरुवात केली आणि दलित नेते काशीराम यांच्याबरोबर आघाडी केली. दलित-पिछडा हा मुलायम यांचा राजकरणातील मास्टरस्ट्रोक होता. यूपीच्या विधानसभेत ४२२ जागांपैकी १७६ जागा त्यांच्या या समीकरणाने जिंकून दाखवल्या. यूपीमध्ये पुन्हा मुलायम सिंह सत्तेवर आल्यानंतर एका घोषणेने देशभर खळबळ उडवली होती, ‘मिले मुलायम – काशीराम, हवा में उड गये जय श्रीराम.’
अयोध्येत बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली, तेव्हा भाजपचे कल्याण सिंह मुख्यमंत्री होते. बाबरी पडल्यावर त्यांना राजीनामा देणे भाग पडलेच. पण तेच कल्याण सिंह भाजपमधून बाहेर पडताच त्यांचे समर्थन करण्यासाठी मुलायम सिंह सरसावले होते. सन २००९ मध्ये कल्याण सिंह यांनी अपक्ष उमेदवार म्हणून एटामधून विधानसभा निवडणूक लढवली. बाबरी मशीद उद्ध्वस्त होण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयापुढे बाबरीच्या सुरक्षिततेची हमी देणारे जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, त्यावरून त्यांना न्यायालयाने शिक्षाही ठोठवली होती. त्याच कल्याण सिंग यांचे एटाच्या निवडणुकीत मुलायम सिंह यांनी समर्थन केले व त्यांच्यासाठी प्रचारसभा घेऊन त्यांना मतदान करावे, असे जनतेले आवाहनही केले. मुलायम सिंह यांचे समर्थन मिळाल्याने कल्याण सिंह निवडणुकीत विजयी झाले. बाबरी उद्ध्वस्त झाल्याप्रकरणी ज्यांना खलनायक ठरवले. काही काळाने त्या कल्याण सिंह यांचे आपण समर्थन केले ही मोठी चूक होती, अशी कबुली मुलायम सिंह यांनी दिली होती.
उत्तर प्रदेशचे तीन वेळा मुख्यमंत्री आणि सात वेळा संसद सदस्य राहिलेल्या मुलायम सिंह यांची सार्वजनिक जीवनातील पंचावन्न वर्षे म्हणजे सतत संघर्ष आणि वादळ आहे. वयाच्या २८व्या वर्षी जसवंतनगर मतदारसंघातून ते प्रथम आमदार झाले. त्यांच्या घरातील यापूर्वी कोणीही राजकारणात नव्हते. ५ डिसेंबर १९८९ रोजी ते उत्तर प्रदेशचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. केंद्रात एच. डी. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना त्यांना देशाचे संरक्षणमंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळाली होती. सात वेळा खासदार व नऊ वेळा आमदार अशी त्यांची विक्रमी संसदीय कारकीर्द आहे.
१९९२ मध्ये त्यांनी समाजवादी पार्टीची स्थापना केली व उत्तर प्रदेशच्या राजकारणात त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले. मुलायम सिंह अध्यक्ष, जनेश्वर मिश्र उपाध्यक्ष, कपिलदेव सिंह व मोहम्मद आजम खान हे दोघे सरचिटणीस, मोहन सिंग प्रवक्ता अशी सपाची सुरुवातीची त्यांची टीम होती. त्यांचा जन्म सैफई. शिक्षण इटावा, फतेहाबाद व आगरा. मैनपुरीच्या इंटर कॉलेजमध्ये त्यांनी काही काळ अध्यापक म्हणूनही काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मुलायम सिंह हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांच्या मुख्यमंत्री परिषदेच्या निमित्ताने अनेकदा भेटी होत असत. या वर्षी १८ जुलैला मुलायम सिंह राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी व्हीलचेअरवरून आले होते, ही त्यांची सार्वजनिक ठिकाणची शेवटीची भेट ठरली. दि. २२ नोव्हेंबर २०१८ रोजी मुलायम सिंह यांचा ८० वाढदिवस लखनऊमध्ये साजरा झाला. पण गेल्या दोन वर्षांत त्यांची प्रकृती त्यांना साथ देईनाशी झाली. हरयाणातील गुरुग्रामधील मेदांत इस्पितळात नेताजींनी अखेरचा श्वास घेतला. उत्तर प्रदेशात गेल्या दोन विधानसभा निवडणुकींत सपाचा लागोपाठ पराभव झाला. मुलायम सिंह यांच्या पश्चात आता समाजवादी पार्टीची धुरा सांभाळणे आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर पक्ष वाचवणे, हे अखिलेश यादव यांना मोठे आव्हान आहे.